मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाला आहे. ईडी प्रकरणात जामीन मिळाल्यानंतरही त्यांच्यावर दाखल असलेल्या सीबीआय प्रकरणात त्यांना तुरुंगातच राहावं लागणार आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर ईडीच्या कचाट्यातून काहीसा दिलासा मिळाला आहे. ईडीच्या गुन्ह्यातून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तथापि सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातून मात्र त्यांची सुटका झालेली नाही. त्यामुळे अद्याप तरी त्यांना गजाआडच राहावं लागणार आहे. दरम्यान अनिल देशमुख यांचे वय आता 72 वर्षे आहे. तसेच त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील नाही. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असे अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी आणि अनिकेत निकम यांनी न्यायालयासमोर सांगितलं. त्यानंतर एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
न्यायालयामध्ये आपली बाजू मांडताना अनिल देशमुख यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, “या प्रकरणांमध्ये कुठेही अनिल देशमुख हे पहिल्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत असं दिसून येत नाही. जे कोणी साक्षीदार आहेत ते आपले जबाब बदलत आहेत. यावरून देशमुख यांच्या सांगण्यावरून हप्ता वसुली केली आहे. हे दिसून येत नाही.
न्यायालयाने रेग्युलर अटेंडन्स, एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यासह, तपासात कोणताही हस्तक्षेप करू नये या तीन अटी घातल्यानंतर जामीन मंजूर केला आहे. तर सीबीआय प्रकरणावर देखील आम्ही लवकरच जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे देखील अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी सांगितल आहे.