सातारा- भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाची ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी जाहीर माफी मागितली आहे. बाळासाहेबांच्या बरोबर मी ज्या लोकांबद्दल नाव घेतली. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आकस नाही किंवा त्यांचा द्वेष करत नाही. राजकीय हेतूने हे आरोप केले नाहीत. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटल्यानंतर आज अखेर बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. बाळासाहेबांच्या बरोबर मी ज्या लोकांबद्दल नाव घेतली. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आकस नाही किंवा त्यांचा द्वेष करत नाही. राजकीय हेतूने हे आरोप केले नाहीत.
महाराष्ट्रातील सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला राज्य सरकारने परवानगी दिली. या निर्णयावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजपसह अनेकांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं. तर याच निर्णयावर ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांवर टीका केली आणि त्यावरुन चांगलाच गदारोळ झाला.
राज्यातील नेते आणि त्यांची मुले दारू पितात. काही दारू पिऊन रस्त्यावर पडत असतात याचे पुरावे सुद्धा आहेत. असे बंडातात्या म्हणाले. इतकंच नाही तर सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतही बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक होत ठिकठिकाणी आंदोलन केलं.
त्यानंतर बंडातात्यांनी माघार घेत आपल्या विधानाची सपशेल माही मागितली आहे. राजकीय हेतूने हे आरोप केले नाहीत. ज्या चार लोकांवर मी आरोप केले त्यांचीच नव्हे तर इतर लोकांचीही माफी मागत आहे. माझं विधान अनावधानाने झालं आहे. त्याबद्दल मी क्षमा मागत आहे, असं बंडातात्या कराडकर यांनी सांगितलं. पोलीस त्यांची ड्युटी करतील. त्यांना आदेश आहेत त्याप्रमाणे ते मला ताब्यात घेतील. आम्ही अटक करून घेऊ, असंही कराडकर यांनी सांगितलं.
राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल
बंडा तात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असुन त्याबाबत सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल 48 तासाच्या आत अहवाल आयोगास सादर करावा. तसेच बंडा तात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा अशा सूचना पोलिसांना दिल्या असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.