पुणे- आईबरोबर असलेल्या कौटुंबिक वादातून पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या तरुणाला बिबवेवाडी पोलिसांनी तीन तासांच्या आत गजाआड केले. पोलिसांनी त्वरित केलेल्या तपासामुळे मुलगा सुखरूपपणे आईच्या कुशीत विसावला.
स्वप्नील रमेश शिंदे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ज्योती धनराज साळुंखे ( रा.पवना नगर चाल क्र ६ )यांनी फिर्याद दिली आहे.
परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योती साळुंखे यांचा पाच वर्षाचा मुलगा नीरज हा बुधवारी (दि. २) संध्याकाळच्या सुमारास आपल्या घरासमोर खेळात असताना आरोपी शिंदे याने चॉकलेटचे आमिष दाखवून जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण केले. फिर्यादी साळुंखे यांनी आरोपी स्वप्नील शिंदे याच्यावर संशय व्यक्त केला. या प्रकरणी फिर्याद दाखल होताच पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. त्यानंतर याच्या नातेवाइकांकडे चौकशी सुरु केली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बिबवेवाडी, स्वारगेट, मार्केटयार्ड या भागात तपास सुरु केला.
अंधारामध्ये पार्क केलेली वाहने चेक करीत असताना पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलीस नाईक देववते व पोलीस हवालदार देशमाने यांना एका रिक्षामध्ये आरोपी एका लहान मुलाला घेऊन बसलेला आढळून आला. या मुलाला ताब्यात घेऊन मुलगा सुखरूप असल्याची खात्री केली. सदर आरोपीने मुलाच्या आईसोबत असलेल्या भांडणाच्या रागातून मुलाला पळवून नेले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे सदर मुलाची आई मॉलमध्ये नोकरी करून ती एकटीच त्या मुलाचा सांभाळ करीत आहे. आरोपीने दुपारपासून पाळत ठेवून मुलाला पळवून नेले.
सदरची कारवाई परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक झारे, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण करके आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.