पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील घरावर संपकरी एसटी कामगारांनी प्रचंड गोंधळ घातला. या कामगारांनी चप्पलफेक देखील केली. एकूणच या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकावण्या मागील मास्टर माईंड कोण आहे याचा पोलीस शोध घेतायत. असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
पवार आज पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकार यांना याबाबत माहिती दिली. अजित पवार म्हणाले, ” मला आश्चर्य वाटत की दोन दिवसांपूर्वी आंदोलन यशस्वी झालं म्हणून गुलाल उधळण्यात आला. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा काय उद्देश होता. आम्ही आंदोलकांसोबत आणि संघटनांसोबत अनेकदा बैठकी घेतल्या आहेत. पण नंतर एसटी कर्मचारी संघटनांचं देखील ऐकत नाहीत. त्यांनी तारतम्य सोडलं, जी भाषा वापरण्यात आली ती आपल्या संस्कृतीत बसत नाही. पोलीस यंत्रणा याचा तपास करुन यामागे कोण मास्टरमाईंड आहे याचा शोध घेतील”
“एसटी कर्मचारी मीडियाला घेऊन सिल्वर ओकवर पोहोचले. अर्थात मिडीयाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणं. मग मिडीयाला जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही ?” असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.
एसटी कर्मचाऱ्यांचा CSMT स्थानकात ठिय्या
आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे.