पुणे : ओपन जिममध्ये व्यायाम केल्यानंतर फोनवर बोलत असताना तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. अमोल शंकर नाकते (वय २१ वर्ष) या युवकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
२१ वर्षीय अमोल शंकर नाकते हा इव्हेंट मॅनेजमेंटची काम करत होता. सोमवारी रात्री व्यायाम झाल्यानंतर फोनवर बोलत असताना अचानक अमोल खाली पडल्याचं पाहून त्याच्या मित्रांनी त्याच्याकडे धाव घेतली आणि जवळच्या दवाखान्यामध्ये त्याला भरती केलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर पायातून विजेचा प्रवाह वाहिल्याने पायाची बोटं काळी निळी झाल्याचं दिसलं. त्यामुळेच त्याचा मृत्यू देखील झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, अद्याप ससून रुग्णालयातील शवविच्छेदन अहवाल आला नसल्याने अमोलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अधिकृत रित्या स्पष्ट झालेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या वतीने जिथे ओपन जिम बांधण्यात आली आहे, तिथं महावितरणची वायर देखील गेली आहे. याच वायरने शॉक लागला असून मृत्यू झाला आहे, असा कुटुंबीयांचा आरोप आहे.
त्यामुळे याबाबत पोलिसांनी अनोळखी व्यक्ती किंवा पालिका किंवा महावितरण यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी असल्याचं अमोल नकाते यांनी केला आहे.
युवकाच्या मृत्यूप्रकरणी विद्युत धक्का कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त झाल्याने महावितरणकडून राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाला लगेचच कळविण्यात आले. विद्युत निरीक्षकांकडून मंगळवारी याप्रकरणी तपासणी व चाचण्यांद्वारे चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार महावितरणकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
घटनेनंतर रात्री परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत महावितरणकडून झालेल्या प्राथमिक पाहणी व चाचणीमध्ये ओपन जीमच्या कोणत्याही इक्यूपमेंटमध्ये विजेचा प्रवाह नसल्याचे दिसून आले. तसेच फ्यूज गेलेला नव्हता. वीजपुरवठा खंडित देखील झाला नव्हता. मध्यरात्रीनंतर एक वाजता स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार भूमिगत वीजवाहिनीची केबल टेस्टिंग व्हॅनद्वारे चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ही वीजवाहिनी सुस्थितीत असल्याचे आढळून आले. तथापि स्थानिकांच्या मागणीनुसार या वाहिनीवरून होणारा एका बंगल्याचा व सोसायटीचा वीजपुरवठा रात्रभर बंद ठेवण्यात आला.
त्यानंतर मंगळवारी विद्युत निरीक्षकांचे एक पथक संबंधित ठिकाणी आले. स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीनुसार तसेच पोलीस विभाग व महावितरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा भूमिगत लघुदाब वाहिनीची केबल टेस्टिंग व्हॅनद्वारे चाचणी करण्यात आली. मेगर व्हॅल्यू व व्होल्टेज लेवल चाचण्या घेण्यात आल्या. त्यातूनही विद्युत धक्का बसल्याचे आढळून आले नाही. तथापि, या संदर्भात विद्युत निरीक्षकांकडून अधिक तपासणी व चाचणी सुरू आहेत. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार महावितरणकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.