पुणे : कोंडवा पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीमध्ये दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार सनी भरत पवार वय (वर्ष 22) याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर एमपीडीए कायद्यान्वये केलेली ही ८५ वी कारवाई आहे.
सनी पवार हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण आणि कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता, चाकू, तलवार यासारख्या जीवघेण्या हत्यारांसह दरोडा, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नांसहित जबरी चोरी करणे, जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे, खंडणी, गंभीर दुखापत, चोरी, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये याच्या विरुद्ध सात गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे आणि मालमत्तेचे नुकसान होईल या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार देखील करत नव्हते. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दहशत निर्माण करणाऱ्या आणि सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. आजपर्यंत 85 गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे.