पुणे : अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवार पेठेतील मे. तिरुमल्ला डेअरी या पनीर विक्रेत्यावर कारवाई करुन २७ हजार ४० रुपये किमतीचा १०४ किलो पनीरचा साठा जप्त केला.
गोपनिय माहितीच्या अनुषंगाने विभागाने ही कारवाई केली असून छाप्यावेळी पनीरचा एक अन्न नमुना तपासणीसाठी घेवून उर्वरित साठा जप्त केला आहे. हा नमुना प्रयोगशाळेकडे तपासणीकरीता पाठविण्यात येणार असून अहवाल प्राप्त होताच आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई पुणे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी सोपान इंगळे व राहूल खंडागळे यांनी केली.
सणासुदीच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब जनतेस निदर्शनास आल्यास त्यांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे सह आयुक्त (पुणे विभाग) संजय नारागुडे यांनी केली आहे.