‘…तर मस्जिदमध्ये घुसून मारू’; नितेश राणे यांना वादग्रस्त वक्तव्य भोवणार, राणेंविरोधात गुन्हा दाखल
रामगिरी महाराजांना विरोध केला तर मस्जिदमध्ये घुसून एका एकाला मारू असे विधान करणे आमदार नितीश राणे यांना चांगलेच भोवले आहे. मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या मोर्चादरम्यान नितेश राणे यांनी हे विधान केले होते त्या मोर्चाच्या आयोजकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर आणि मुस्लिम समाजाचा अपमान करणारे वक्तव्य केले असल्याने त्यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम समुदायाकडून आणि नेत्यांकडून होत होती. त्यामुळेच अहमदनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितेश राणेंनी मुस्लिम नागरिकांना उद्देशून ही धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात मुस्लिम समाजा बद्दल नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘एका एकाला पकडून मारु’, असे नितेश राणे म्हणाले होते, असा उल्लेख तक्रारीत आहे. भडकाऊ भाषण करणे आणि धार्मिक भावनांना ठेच पोचवल्याप्रकरणी राणे यांच्या विरोधात कलम 302, कलम 153 यासह इतर काही कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.