पेशंट राइट्स फोरम या संस्थेने आरटीआय कायद्या अंतर्गत मागवलेल्या माहितीनुसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात 2012 ते 2022 या दहा वर्षात संक्रमित रक्त दिल्याने 1442 निष्पाप नागरिकांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समजते आहे. त्याचबरोबर अनेकांना हिपेटाइटिस बी आणि सीची देखील लागण झाल्याचं उघड झालं आहे.
यासंदर्भात पेशंट राइट्स फोरमचे राज खंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नागपूरमध्ये 12 थैलेसेमियाच्या रुग्णांना संक्रमित रक्तामुळे एचआयव्हीची लागण झाली होती. हे सर्व रुग्ण दहा वर्षाखालील होते. तर पाच वर्षाच्या दोन निष्पाप मुलांचा मृत्यू देखील ओढावला आहे.
त्यानंतर दहा वर्षात एचआयव्ही झालेल्या रुग्णांची माहिती मागवण्यात आली होती. या माहितीच्या आधारे दहा वर्षात संक्रमित रक्तामुळे 1442 निष्पाप नागरिकांना एचआयव्हीची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.