दक्षिण भारतीय अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘ पुष्पा: द राइज ‘ हा चित्रपट सध्या सगळीकडेच धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाची कथा ही तितकी वाखणण्याजोगी आहे. कथेत ‘ पुष्पा ‘ नावाचा एक मजूर चंदन तस्करीच्या व्यवसायात उतरतो. तो हळूहळू या व्यवसायात इतका प्रवेश करतो की त्याला काही काळात करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ही कथा काल्पनिक असली तरीही या चित्रपटात दर्शवलेल्या रक्तचंदनाबद्दल जवळजवळ सर्व काही खरं आहे. भारतात रक्तचंदन हे एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. त्याला लाल सोनंही बोललं जातं.
भारतातील या ‘ रेड गोल्ड ‘ चा इतिहास जाणून घ्या
रक्तचंदनाची झाडे आंध्रप्रदेश राज्य सोडून इतर कुठेही येत नाहीत. तामिळनाडूच्या सीमेला लागून असलेल्या आंध्रप्रदेशातील फक्त 4 जिल्ह्यांमध्ये लाल चंदनाचे लाकूड उपलब्ध होते. नेल्लोर, चित्तूर, कडप्पा आणि कुरनूलच्या शेषाचलम टेकड्यांमध्ये ही झाडं वाढतात. ही झाडे पाण्यात बुडू शकतात आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. रक्तचंदन सरासरी 8 ते 11 मीटर उंचीपर्यंत वाढतं.
भारतात रक्तचंदनाला खूप मागणी आहे. रक्तचंदनाचं झाड हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. त्यामुळे उदबत्तीपासून ते तिलकांपर्यंत याचा वापर केला जातो. रक्तचंदनाचे लाकूड तीन रंगात आढळते. पांढरा, लाल आणि पिवळा. पण रक्तचंदन म्हणजेच लाल लाकूड हे इतर दोन रंगीत लाकडांइतके सुगंधित नसते. त्याचं वैज्ञानिक नाव टेरोकार्पस सॅंटलिनस असं आहे. महागडे फर्निचर आणि सजावटीमध्ये वापरण्यात येत असल्यामुळे रक्त चंदनला नेहमीच जास्त मागणी असते. सौंदर्य वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो. वाईन बनवण्यासाठीही रक्तचंदनचा वापर होतो.
रक्तचंदनाच्या सुरक्षेसाठी एसटीएफ तैनात
या झाडांच्या संरक्षणासाठी एसटीएफ तैनात आहे.आता सोन्यासारखी महागडी वस्तू घनदाट जंगलात सापडली तर कोणाच्या डोळ्यांना ते पाहण्याचा मोह आवरणार नाही. त्यामुळे त्याची तस्करीही मोठ्या प्रमाणात होते. या सर्व बेकायदेशीर गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी ज्या भागात ही विशेष लाकडे आढळतात त्या ठिकाणी एसटीएफ विशेष तैनात करण्यात आली आहे. चीन, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया असे अनेक देश आहेत जिथे या लाकडांना जास्त मागणी आहे. पण या जंगलांवर सर्वात जास्त चीनची नजर असते. त्याची तस्करीही या भागांत मोठ्या प्रमाणात होते. रक्तचंदनची तस्करी रोखण्यासाठी भारतात अनेक कडक कायदे आहेत. तरीही रस्ता, हवा, पाणी या तिन्ही मार्गांनी त्याची तस्करी होते. पकडलं जाऊ नये म्हणून काही वेळा त्याची पावडर स्वरूपात देखील तस्करी केली जाते. या कारणास्तव गेल्या काही वर्षांत या विशेष लाकडांची संख्या 50% टक्क्याने कमी झाली आहे. अनेकांना तस्करी करताना मोठी अटकही करण्यात आली आहे. तस्करी करताना पकडल्यास भारतात 11 वर्षांच्या कारावासाचीही तरतूद आहे.