पिंपरी- केंद्र सरकारमध्ये बडे अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून तब्बल अडीचशे पेक्षा जास्त तरुणींना फसविणाऱ्या आणि त्यांचे शारीरिक शोषण करणाऱ्या दोन भामट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी जेरबंद केलंय. एका सामाजिक कार्यकर्ता महिलेच्या मदतीने या दोघांना पोलिसांनी अटक केली.
निशांत रमेशचंद नंदवाना आणि हर्षद शर्मा अशी या दोन भामट्यांची नावे आहेत. दोघांच्या विरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत रमेशचंद नंदवाना आणि हर्षद शर्मा हे दोघेजण मूळचे राजस्थानमधील असून त्यांनी आजपर्यंत कर्नाटक, महाराष्ट्र, आणि हरयाणा राज्यातील एकूण २५५ मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे तसेच त्यांचे शारीरिक शोषण केले आहे.
कधी अभव कश्यप तर कधी अदीत व्यास… कधी आघव अग्निहोत्री तर कधी अश्विक शुक्ला अशा वेगवेगळ्या नावाने बनावट आधारकार्ड तयार करून केंद्र सरकारच्या विविध खात्याचे बनावट आयकार्ड तयार करून हे दोन भामटे मेट्रोमोनीयल साईटवर आपली माहिती द्यायचे. त्यांच्याशी संपर्क केलेल्या मुलींशी ओळख करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करायचे.
पुण्यती सामाजिक कार्यकर्त्या मनीषा धारणे यांच्याशी काही पीडित तरुणींनी संपर्क साधला असता धारणे यांनी त्यांची सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी धारणे यांनी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या दोघांना अटक केली. दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून पिंपरी-चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments are closed.