रियल्टी क्षेत्रात अनेक जण रिसेल किंवा पुनर्विक्रीला काढलेले फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करतात. असे फ्लॅट खरेदी करण्यामागचे मुख्य कारण असते की ते नव्या फ्लॅटच्या तुलनेत स्वस्त असतात आणि फर्निश्डही असतात. त्यामुळे फ्लॅटच्या इंटिरियरवर वेगळा खर्च करावा लागत नाही. पण रिसेल फ्लॅट खरेदी करताना काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात.
१. आपण नवा फ्लॅट खरेदी करतो तेव्हा बिल्डरला आपण दहा टक्के डाऊन पेमेंट करतो. पण रिसेल फ्लॅटच्याबाबतीत ही रक्कम वीस टक्के किंवा त्याहून अधिक असते. त्याचबरोबर नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, हस्तांतरण शुल्कसारखे काही सक्तीचे खर्च तुम्हाला असा फ्लॅट खरेदी करताना करावे लागतील.
२. काही वेळा फ्लॅटच्या आधीच्या मालकाने सोसायटी किंवा अपार्टमेंट व्यवस्थापनाचे ठरलेले पैसे भरलेले नसतात. ते पैसे नव्या मालकाकडून वसूल केले जातात. त्याशिवाय फ्लॅटमध्ये काही किरकोळ दुरूस्त्यासारखे, पार्किंग/सिक्युरिटी चार्जेस, सोसायटी सदस्यत्वाची फी वगैरे किरकोळ खर्च वाढण्याचीही शक्यता असते. मात्र रिसेल फ्लॅट किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचे काही थेट फायदे आहेत.
३. पहिला फायदा म्हणजे अशा प्रॉपर्टीची किंमत बाजारभावापेक्षा काहीशी कमी असते.
४. तयार फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्यामुळे आपले भाड्याने राहण्याचा खर्च वाचतो. काही वेळा आपल्याला भाडे आणि इएमआय दोन्ही द्यावे लागतात. असा फ्लॅट किंवा प्रॉपर्टी खरेदी केल्यावर आपण तेथे लगेच रहायला जाऊ शकतो आणि त्यामुळे हे खर्च वाचतात.
५. शिवाय अशा फ्लॅटमध्ये जे काही असते ते तुमच्या समोर असते. कोणतीही लपवाछपवी नसते की फसवाफसवी नसते. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींमध्ये काही वेळा फसवणुकीचे प्रकार घडतात. आपल्या सँपल फ्लॅट दाखवलेला असतो, त्यापेक्षा काही तरी वेगळेच आपल्या पदरात पडते. रिसेल फ्लॅटमध्ये हा प्रकार घडत नाही.
६. तसेच अशा फ्लॅटचा ताबा लगेच मिळत असल्याने अगदी पहिल्या इएमआयपासून तुम्हाला कर सवलतीचा फायदाही उठवता येतो.
सावधगिरीही बाळगा
७. कागदपत्रे नीट आणि काळजीपूर्वक पहा. मालकाने जे सांगितले आहे त्याची नोंद कागदपत्रांत आहे की नाही याची व्यवस्थित पडताळणी करा.
८. प्रॉपर्टी विकणारी व्यक्तीच त्या प्रॉपर्टीचा खरा मालक आहे याची खातरजमा करून घ्या.
९. सोसायटी, इमारत किंवा त्या घरावर मालकाचे काही देणे आहे का हे पहा
१०. फ्लॅट किंवा प्रॉपर्टीची स्थिती कशी आहे हेही त्या प्रॉपर्टीत पैसे गुंतवण्यापूर्वी पाहून घ्या.
११. फ्लॅट जर बँकेकडे गहाण असेल तर मालकाने कर्जाच्या रकमेची परतफेड केल्यावर त्या फ्लॅटसंदर्भातील सर्व कागदपत्रे खरेदीदाराला दिली जातील, असे
पत्र बँकेकडून आणण्याची मालकाची जबाबदारी असते. तुम्ही विक्रेत्याच्या खात्यावर पैसे जमा केल्यावर लगेचच बँक सर्व मूळ कागदपत्रे तुम्हाला देते आणि कर्जाची परतफेड झाल्याचे तसेच मालकावर कोणताही बोजा नसल्याचे प्रमाणपत्रही देते.
१. रिसेल फ्लॅटचे बांधकाम जास्तीतजास्त दहा वर्षांपूर्वीचे असावे.
२. बिल्डरची ख्याती आणि बांधकामाच्या दर्जाकडे लक्ष द्या.
३. फ्लॅट का विकायला काढला आहे याचे कारण जाणून घ्या. तसे केल्याने पुढे येणार्या समस्या टाळता येतील.
४. भोवतालचे वातावरण, सोयीसुविधांची उपलब्धतता, आवश्यक बाबी म्हणजे बाजार, दवाखाना, बस स्टॉप वगैरे गोष्टी किती जवळ आहेत हेही रिसेल फ्लॅट विकत घेताना लक्षात घ्या.