अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत कौर स्टारर चित्रपट ‘दसवी’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते, या चित्रपटात अभिषेक बच्चन एका राजकारण्याच्या भूमिकेत आहे जो दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी धडपडतो. या चित्रपटात अभिषेक बच्चन दहावी पास आहे का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल, पण त्याआधी हे जाणून घ्या की, या चित्रपटाला उत्तम चित्रपट होण्याच्या कसोटीत किती गुण मिळाले आहेत?
मुख्यमंत्री गंगाराम चौधरी (अभिषेक बच्चन) यांचे नाव एका घोटाळ्यात समोर आल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर या हरियाणवी नेता त्याच्या तुरुंगवासात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतो. दहावी पास होईपर्यंत पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही, अशी शपथ तो घेतो. दरम्यान, तुरुंगात गंगाराम, ज्योती देसवाल (यामी गौतम) या पोलीस अधिकाऱ्याची भेट होते. जी गंगाराम चौधरीच्या आदेशाला नकार देते. दुसरीकडे, गंगारामची पत्नी विमला देवी (निम्रत कौर) हिच्या मनात खुर्ची आणि सत्तेची लालसा निर्माण होते. कुटुंबात मुख्यमंत्री पद टिकवून ठेवण्यासाठी, ती आपल्या पतीची जागा मिळवते आणि नंतर तिचे स्थान पुन्हा मिळविण्यासाठी राजकारणाचा अवलंब करते.
‘दसवी’ हा एक मनोरंजक चित्रपट असून शिक्षणाच्या अधिकाराचा प्रसार करणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे. रितेश शाह, सुरेश नायर आणि संदीप लेझेल या लेखकांनी चांगल्या पद्धतीने कथा मांडण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. पूर्वार्धात, कथा आणि चित्रपटाच्या फोकसपासून हा चित्रपट दूर गेल्याचे जाणवते. मात्र, मध्यंतरानंतर जेव्हा चित्रपट पकड धरू लागतो त्यावेळी लांबलचक आणि जड संवाद चित्रपटात कंटाळा निर्माण करतात.
अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांच्या केमिस्ट्रीबद्दल बोलायचे झाले तर, दोघांचे ऑन-स्क्रीन समीकरण अगदी बेसिक लेव्हलचे वाटते, त्यांच्यात कोणतीही केमिस्ट्री दिसत नाही. ज्या प्रकारची कॉमेडी चित्रपटातून अपेक्षित होती ती यामध्ये दिसून येत नाही. त्यामुळे चित्रपट रसिकांची पकड घेत नाही.
अभिनयाच्या बाबतीत अभिषेक बच्चन याने चित्रपटात चौधरीच्या भूमिकेतून जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण दिग्दर्शनाच्या कमतरतेमुळे त्याच्या अभिनयाला ती धार मिळालेली दिसत नाही. यामी गौतमला चित्रपटात आणखी वाव मिळायला हवा होता. मात्र, तिने आपल्या व्यक्तिरेखेतुन भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. निम्रत कौरनेही आपल्या जुन्या अभिनयाला नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला. उत्तम कलाकारांची टीम घेऊनही या कलाकारांकडून जसं काम करता आलं असतं, तसं काम दिग्दर्शकाला करता आलेले नाही.
एकूणच शिक्षण प्रणालीमधील त्रुटी सांगण्याचा प्रयत्न ‘दहावी’मध्ये असफल ठरल्याचे दिसून येते. एवढेच काय शिक्षणाचे महत्व सांगणाऱ्या गोष्टी देखील प्रेक्षक फार गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. एक मात्र खरे की, काहीतरी नवीन शिकण्यास कधीही उशीर होत नसतो.