पुणे – मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयावर मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अचानकपणे वसंत मोरे यांना पक्षाच्या शहराध्यक्षपदावरून हटवण्यात आले. या सर्व घडामोडीनंतर वसंत मोरे कुठल्या पक्षात जाणार, मनसेमध्येच राहणार याबाबतच्या चर्चा रंगल्या असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट वसंत मोरे यांना फोन करून शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
माजी नगरसेवक व मोरे यांचे जवळचे मित्र साईनाथ बाबर यांची मनसेच्या शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, “मी मनसेतच आहे. मनसैनिक म्हणून मी काम करीत राहणार,” असे मोरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात वसंत मोरे नेमकी काय भूमिका घेतात ? मनसे सोडून शिवसेनेची ऑफर स्वीकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसेच्या नवीन शहराध्यक्ष साईनाथ बाबत यांचे वसंत मोरेंनी अभिनंदन केले आहे. ”मला अनेक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन येत आहे, पण मी मनसैनिक म्हणून मी काम करीत राहणार,” असे मोरेंनी स्पष्ट केलं असले तरी त्याची पुढील राजकीय वाटचाल काय असेल हे लवकरच समजेल.