Aalandi News

पोलीस-वारकऱ्यांमध्ये झालेल्या झटापटीप्रकरणी पोलीस आयुक्तांनी केला ‘हा’ मोठा दावा

512 0

पुणे : मागच्या वर्षीच्या ‘पालखी प्रस्थान सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत काही महिला जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मानाच्या दिंडीप्रमुखांनी त्याला मान्यता दिली होती. मात्र तरीदेखील रविवारी काही स्थानिक युवकांनी मंदिरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र यादरम्यान स्थानिक आणि पोलीस यांच्यात किरकोळ झटापट झाली. यावर आता पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रतिक्रिया देताना पोलिसांनी लाठीमार किंवा बळाचा वापर केलेला नाही,’ असा दावा केला आहे.

तसेच ‘सर्व वारकरी प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये,’ असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. पोलिस आणि वारकरी यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.

या प्रस्थान सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, आमदार श्रीकांत भारतीय, पालखी सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, माजी विश्वस्त सुधीर पिंपळे, डॉ. प्रशांत सुरू, अभय टिळक, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींसह वारकरी, मानकरी, सेवेकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!