पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला . या सोहळ्यात वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र या पालखी सोहळ्यात दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या झटापटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेवरून राज्याचे राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. सगळ्यांनी या गोष्टीवर निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. मात्र आता पोलिसांनी या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे.
पोलिसांकडून नवा व्हिडीओ जारी
आळंदीमध्ये जो प्रकार घडला त्या संदर्भात पोलिसांकडून एक नवा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आळदींमध्ये पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये जी झटापट झाली त्याची दुसरी बाजू दाखवण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये वारकऱ्यांचा लोंढा पुढे जाताना दिसत आहे, त्याचदरम्यान पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला. यामध्ये एक पोलीस वारकऱ्यांच्या या गर्दीमध्ये चेंगरला गेला असल्याचे दिसले.
आळंदीमध्ये नेमके काय घडले? पोलिसांनी शेअर केला प्रकरणाची दुसरी बाजू दाखवणारा व्हिडिओ pic.twitter.com/USHOMi0Kxf
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 12, 2023
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले ‘पहिली गोष्ट म्हणजे लाठीचार्ज झालेला नाही, मात्र तिथे थोडीफार बाचाबाची आणि झटापट झालेली आहे. 400-500 तरुण वारक ऱ्यांनी बॅरिकेट्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनाही थोडं लागलं आहे. आपण व्हिडिओ बघितले तरी तिकडे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यांना थांबवण्याचाच प्रयत्न केलेला आहे. नंतर परिस्थिती शांत झाली आहे,’ असं फडणवीस म्हणाले आहेत.