सध्या समाजातील संवेदनशीलता झपाट्याने कमी होत असून अशावेळी संवेदनां चे प्रत्यारोपण करण्याची आत्मप्रेरणा ही बावन्नकशी सोन्यासारखी आहे. समाजातील विध्वंसक, विघातक ,विकृतीची रेषा जर कमी करायची असेल तर संस्कृतीची रेषा वाढवावी लागेल व भोई प्रतिष्ठान ने या दृष्टीने स्तुत्य आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन भारत सरकार आय.सी.सी.आर. चे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत विनयजी सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले .
प्रत्येक संस्थेत, संघटनेमध्ये ,राजकीय पक्षात कार्यकर्ता हा समान धागा असतो. त्याचे कर्तृत्व ,समर्पण, कर्तव्यनिष्ठता विलक्षण असते .नेता होणे सोपे आहे पण कार्यकर्ता होणे अवघड आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांचा सन्मान करणाऱ्या भोई प्रतिष्ठानचे कार्याला मी वंदन करतो*
गणेशोत्सवात अहोरात्र राबणाऱ्या स्वयंसेवी संस्था विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भोई प्रतिष्ठान तर्फे आयोजित कृतज्ञता समारंभात विनय सहस्त्रबुद्धे बोलत होते.
याप्रसंगी मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिलीप पुराणिक, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ रवींद्र साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना गणेशोत्सवात अनेक व्यक्ती आणि संस्था सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अहोरात्र राबत असतात ,त्यांच्या या निरपेक्ष कृतिशीलते ला वंदन करण्यासाठी भोई प्रतिष्ठान तर्फे गेली 18 वर्षे कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.
मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी समाजातील अनेक हात उत्सव निर्विघ्नपणे होण्यासाठी राबत असतात, रथात बसणारे खूप असतात पण रथ ओढणारे कमी असतात. या रथ ओढणाऱ्या तळागाळातल्या कर्मयोगयांच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्याची संस्कृती रूजवणारा हा कार्यक्रम घडवून भोई प्रतिष्ठान ने स्तुत्य आदर्श निर्माण केला आहे असे सांगितले.
या कार्यक्रमात गणेशोत्सव निर्विघ्न पणे पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पुणे अग्निशमन दल, पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी युनियन, पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास, नदीपात्रात जीव रक्षणाचे काम करणारे जीवरक्षक, प्रशासनाला मदत करणारे विद्या बँक, पुणे पीपल बँक,कॉसमॉस बँक,दरबार बँड , वाडिया कॉलेज,काळे मंडप ,सुर्वे मंडप, एम एस ई बी चे कर्मचारी, ट्रॅक्टर चालवणारे ,आपत्कालीन वैद्यकीय उपचार देऊन गर्दी मधील नागरिकांचे जीव वाचवणारे आरोग्य सेवक ,विसर्जन मिरवणूकीत काम करणारे डॉक्टर, रुग्णवाहिका चालक,सजावटकार, शिल्पकार, या सर्वांचा कृतज्ञता सन्मान देऊन गौरव करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशीष जराड यांनी केले तर आभार प्रदर्शन शिरीष मोहिते यांनी केले .