आपल्या आईचे प्रेम प्रकरण चार वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतले. आईच्या प्रियकराने केलेल्या मारहाणीत चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नाशिक मध्ये घडली असून पुण्यातील बिबेवाडी पोलिसांनी याचा तपास करत मुलाच्या आईला व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. तसेच पुणे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तो नाशिक पोलिसांकडे वर्ग केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मयत मुलाची आई पल्लवी ही मुळशी लातूर जिल्ह्यातील आहे. पुण्यातील बिबेवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणाशी तिचा विवाह झाला. त्यातून तिला दोन मुली व एक मुलगा झाला. मात्र अनेक दिवसांपासून तिचे पतीशी पटत नव्हते. त्याचवेळी तिची ओळख महेश कुंभार नावाच्या तरुणाशी झाली. ओळखीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी पल्लवी आपल्या मुलांना घेऊन महेश बरोबर नाशिकमध्ये राहायला गेली.
नाशिकच्या पंचवटी भागात ते मोलमजूरी करून राहत होते. काही दिवसांपासून पल्लवीचा चार वर्षांचा मुलगा वेदांश आजारी होता. या घटनेच्या दिवशी त्याने जेवण केले पण जेवणानंतर त्याला उलटी झाली. उलटी झाल्याचे पाहून महेशला राग आला. त्याने वेदांशला झाडूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत वेदांश बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. त्यावेळी तर रुग्णालयाने आपल्या इथे ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मात्र तरीही वेदांतला तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात नेले नाही. त्याची प्रकृती गंभीर झाली.
त्यानंतर पल्लवी आणि महेशने वेदांशला पुण्यातील रुग्णालयात नेले. मात्र त्या आधीच त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. या मुलाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या. त्यानंतर पोलिसांनी पल्लवीची कसून चौकशी केली. त्यावेळी तिने घडलेली घटना सांगितली. यादरम्यान तिच्या सात वर्षांच्या मुलीकडे पोलिसांनी विचारणा केली असता तिने वेदांश ला झालेल्या मारहाणी पासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतची संपूर्ण घटना सांगितली. लगेचच पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तर बिबेवाडी पोलिसांनी हा गुन्हा नाशिक पोलिसांकडे वर्ग केला आहे.