सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सायन्स पार्क’ आता स्वतंत्र इमारतीत

378 5

लहान व किशोरवयीन मुलामुलींना विज्ञानाची गोडी लागावी व कुतूहल निर्माण व्हावे या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१४ साली सुरू केलेल्या ‘सायन्स पार्क’चा आता अधिक विस्तार होणार आहे. ‘सायन्स पार्क’ च्या नव्या इमारतीचे उद्घाटन उद्या सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता भारत फोर्ज कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक पद्मभूषण बाबा कल्याणी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी परसिस्टंट सिस्टीम कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे, प्राज इंडस्ट्रीचे संस्थापक व कार्याध्यक्ष डॉ.प्रमोद चौधरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, प्रतिष्ठित प्राध्यापक आणि सायन्स पार्कचे समन्वयक डॉ. दिलीप कान्हेरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठातील ‘सेन्टर फॉर सायन्स एज्युकेशन अँड कम्युनिकेशन’ म्हणजेच सायन्स पार्कची सुरुवात २०१४ साली करण्यात आली. जीवनशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आदी विषयांत तयार करण्यात आलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील माहिती देण्याबरोबरच विद्यापीठ परिसरात असणाऱ्या अनेक पर्यावरणविषयक घटकांची सफरही यावेळी घडविण्यात येते. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या सायन्स पार्क ला भेटी दिल्या आहेत अशी माहिती डॉ.कान्हेरे यांनी दिली.

याआधी तीन ते साडेतीन हजार चौरस फूट जागेत सुरू असणाऱ्या सायन्स पार्कला आता स्वतंत्र इमारतीत १५ हजार चौरस फूट जागा उपलब्ध झाली आहे. यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र व रसायनशास्त्र प्रयोगकक्षाबरोबरच चार स्वतंत्र प्रयोगकक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच विज्ञान विषयक माहितीपट दाखविण्यासाठी प्रक्षेपण कक्ष व अवकाश निरीक्षणासाठी दोन मोठ्या दुर्बिणीही उपलब्ध असल्याचे डॉ. कान्हेरे यांनी सांगितले.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!