पुण्यातल्या खडकवासला जलाशयात सध्या १९.४१ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा एकूण क्षमतेच्या ६६.५८ असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा पाणीसाठा २०२४ पेक्षा साधारणतः एक दीड टीएमसी जास्त आहे. सध्या शेतीचं आवर्तन बंद आहे. त्यामुळे पानशेत आणि वरसगाव धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. वरसगाव आणि पानशेत या दोन्ही धरणांमधली पाण्याची पातळी ही सध्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.कालवा सल्लागार समितीने मंजुरी दिल्यानंतर या धरणांतून उन्हाळी आवर्तनाचे पाणी सुरु करण्यात येईल. हे पाणी सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खडकवासला लाभ क्षेत्रात इंदापूर तालुका हे शेवटचं टोक आहे. साधारणपणे 66 हजार हेक्टर शेतीसह दौंड, हवेली, पुणे शहर आणि जिल्ह्यामधील लाखो रहिवासी हे खडकवासला धरणसाखळीवर अवलंबून आहेत.
असं असताना पुणेकरांना पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनीची जोडणी करण्यासाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी गुरुवारी शहरातील काही भागांतील पाणीपुरवठा बंद राहील. पुण्यातील सहकारनगरमधल्या काही भागात पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. पर्वतीमधील पाण्याच्या टाकीमधून होणारा पाणीपुरवठा 6 फेब्रुवारीला बंद राहणार आहे. त्यामुळे सहकारनगरमधील काही ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच शुक्रवारी कमी दाबाने आणि सकाळी उशीरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.तुळशीबागवाले कॉलनी, मेघना सोसायटी, सहकारनगर क्रमांक 2 कमानीच्या आतला भाग, स्वानंद सोसायटी, गोविंद गौरव सोसायटी, संत ज्ञानेश्वर सोसायटी, नामदेव सोसायटी, लकाकी सोसायटी, अण्णाभाऊ साठे कॉलनी, शाहू कॉलनी, लक्ष्मीनगर मनपा शाळा १११ जवळच्या भागातला पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती देण्यात आली आहे. ही माहिती पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.