पुण्यात जीबीएस या आजाराच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या शहरात या आजाराचे 163 संशयित रुग्ण आहेत. त्यांच्यावर शहरातल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा आजार नेमका कशामुळे फैलावतोय याचं मूळ अद्यापही सापडलेल नाही. जीबीएस केवळ पाण्यामुळेच नाही तर या व्यतिरिक्त या आजाराची वेगळी कारणे शोधली जात आहेत. विशेषतः पशुसंवर्धन विभागाकडून जीबीएस बाबत संशोधन करण्यात येणार आहे.९ जानेवारीपासून पुण्यात आणि पुण्यातील आजूबाजूच्या परिसरात जीबीएसचे रुग्ण हे आढळून येत आहे. आत्तापर्यंत शहरात या आजाराचे १६३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पुणे महापालिकेच्या हद्दीतील ३२ रुग्ण, नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील ८६ रुग्ण, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील १८ रुग्ण, पुणे ग्रामीण भागातील १९ रुग्ण आणि इतर जिल्ह्यातील ८ अशी एकूण रुग्णांची संख्या ही १६३ आहे. यातील १११ दवाखान्यात उपचार घेत आहेत. तर ४७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांचा डिस्चार्ज झाला आहे. जे १११ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहे त्यातील ४७ रुग्ण आयसीयूमध्ये असून यातले २१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.
या आजाराचं नेमकं मूळ काय जीबीएस आजार कशामुळे वाढतोय याचं मूळ आरोग्य विभागाला अद्याप सापडलेल नाही. त्यामुळे आरोग्य विभागाकडून पाण्याव्यतिरिक्त संशोधन करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने या आधीच जीबीएस बाधित भागातील पाण्याची तपासणी केली. तसंच आरओचे पाणी दूषित असल्याचीही माहिती दिली. पण आता आरोग्य विभागाला संशय हा केवळ पाण्यावरच नाही तर पोल्ट्रीफार्म, माती आणि विविध पक्षी यावरही आहे. याच अनुषंगानं. पशुसंवर्धन विभागाकडून खडकवासला भागातील पोल्ट्रीफॉर्म, माती आणि विविध पक्ष्यांच्या घश्यातील सँपल तसेच त्यांच्या विष्ठेतील सँपल घेऊन या आजराबाबत संशोधन करून नेमकं त्या परिसरात का रुग्ण वाढत आहे, याबाबत माहिती घेतली जात आहे. लवकरच या नमुन्यांचा अहवाल समोर येईल. तो अहवाल समोर आल्यानंतर नेमकं कारण काय याचीही स्पष्टता होईल.