Pune Police

PUNE POLICE पुण्यातील गुन्हेगारांचा होणार पक्का बंदोबस्त; पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

229 0

पुण्यात गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. मात्र त्या तुलनेत पोलीस आणि पोलीस ठाण्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळेच या वाढत्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. पुणे शहरात नवीन पोलीस ठाणी आणि अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदांची भरती केली जाणार आहे.‌ याबाबतचा प्रस्ताव पुणे पोलिसांकडून राज्य सरकारला पाठवण्यात आला होता ज्याला राज्य सरकारने आता मंजुरी दिली आहे.

पुणे शहराचा विस्तार वाढला आहे. नवीन गावांचा समावेश झालाय. ज्यामुळे पुणे शहर हे मुंबईपेक्षाही मोठं शहर बनलंय. आणि तितकंच मोठं आव्हान बनलंय ते पुण्यातल्या गुन्ह्यांना आणि गुन्हेगारांना रोखणं.. गेल्या काही वर्षांमध्ये खून, लैंगिक अत्याचार, दरोडे, वाहन तोडफोड, कोयता गॅंग आणि गॅंगवॉर हे सगळंच वाढल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण आहे आणि या गुन्हेगारांवर वचक ठेवताना पुणे पोलिसांची दमछाक होत आहे. त्यामुळे पुण्यात सात नवी पोलीस ठाणी आणि अतिरिक्त 1700 पोलीस कर्मचाऱ्यांची पदं भरली जावीत, असा प्रस्ताव पुणे पोलिसांच्या वतीने राज्य सरकारला पाठवला होता. ज्याला आता राज्य सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. खरंतर याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी आधीच याबाबतची माहिती दिली होती मात्र आता सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाली असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

पुणे पोलिसांच्या वतीने 1700 अतिरिक्त पोलीस पदांची उपलब्धता व्हावी असा प्रस्ताव पाठवला होता मात्र सरकारच्या वतीने 816 पोलिसांच्या पदांना मंजुरी मिळाली आहे. तर आता ही नवीन पोलीस ठाणी नेमकी कुठे उभारली जाणार आणि त्यामध्ये किती पोलिसांची भरती होणार आहे पाहूया

सध्या पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 32 पोलीस ठाणी आहेत. त्यामध्ये आणखी सात पोलीस ठाणी वाढणार आहेत. सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, हडपसर, कोंढवा, वानवडी, चतुःर्श्रुंगी, लोणीकंद आणि लोणी काळभोर या ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्यांचं विभाजन करून ही नवी ठाणी कार्यरत होणार आहेत. याचाच अर्थ पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत पुढील काळात एकूण 39 पोलीस ठाणे असणार आहेत.

यापैकी हवेली आणि सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही भाग वेगळा करून नांदेड सिटी पोलिस ठाणे उभारलं जाईल. यासाठी 8 कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पोलिसांची 118 पदं मंजूर करण्यात आली आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचं विभाजन करून आंबेगाव पोलीस ठाणं उभारण्यात येईल या ठिकाणी सात कोटी नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून पोलिस ठाण्यासाठी 98 पद मंजूर करण्यात आली आहेत.

चंदननगर पोलिस ठाण्याचे विभाजन करून खराडी पोलीस ठाणे उभारलं जाईल. ज्यासाठी साडेसात कोटी रुपयांचा निधी आणि 103 पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

हडपसर, कोंढवा आणि वानवडी पोलिस

ठाण्याच्या हद्दीतील काही भाग वेगळा करून त्या ठिकाणी काळेपडळ पोलीस ठाण्याचे निर्मिती केली जाईल. या पोलीस ठाण्यासाठी 140 पोलिसांची पद तर 10.24 कोटी रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे.

त्याचबरोबर हडपसर आणि लोणी काळभोर पोलिस खाण्याचा काही भाग वेगळा करून फुरसुंगी पोलीस ठाणं तयार केलं जाईल. यासाठी 8.81 कोटी निधी आणि 112 पोलीस पदांना मंजुरी देण्यात आले आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्याचे विभाजन करून वाघोली पोलीस ठाण्याचे निर्मिती केली जाईल. यासाठी 118 पदं आणि 8.75 कोटी निधीला मजुरी देण्यात आली आहे.

चतु:शृंगी पोलिस ठाण्याचा विभाजन करून बाणेर पोलीस ठाणे करण्यात येईल. यासाठी 8.60 कोटींचा निधी आणि 118 पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

याबरोबरच बंडगार्डन पोलिस ठाण्यासाठी नवीन इमारत उभारण्यास मंजुरी मिळाली असून 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या नवीन पोलीस ठाण्यांसाठी सध्या जागा आणि इमारती शोधण्याचं काम सुरू आहे. तर सर्व पोलीस ठाण्यांचा भूमिपूजन हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाच वेळी व्हावं असा मानस असून आचारसंहिता पूर्वी हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.

Share This News
error: Content is protected !!