पुणे- 20 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे(पिफ)उद्घाटन 3 मार्च रोजी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित ‘पिफ’ची माहिती संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिफचे क्रिएटिव्ह डायरेक्टर समर नखाते, एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम, मेघराज राजे भोसले, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, सबिना संघवी आदी उपस्थित होते. स्वित्झर्लंडच्या मानो खलील यांच्या ‘नेबर्स’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. उद्घाटन सोहळ्यात सुरुवात शर्वरी जमेनीस, गणेश चंदनशिवे आणि यशवंत जाधव हे सादरीकरण करतील.
दि. 4 ते 10 मार्च दरम्यान एनएफएआयमध्ये ‘चित्रांजली’ या भित्तिचित्रे प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन स्वातंत्र्यसैनिक, युद्धवीर या थीमवर आधारित आहे. या सध्या नामशेष होत असणाऱ्या 35 एमएम या फॉरमॅटमध्ये सत्यजित रे यांचे ‘अगंतुक’, ‘देवी: आणि ‘जलसागर’ हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यासह भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतीत ‘गुंळाचा गणपती’ आणि साहिर लुधियानवी यांच्या स्मृतीत ‘प्यासा’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. मागील अनेक वर्षांपासून एनएफएआयमध्ये झालेल्या संशोधनावर आधारित कानडी सिने दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.