पुणे – कौटुंबिक वादातून बायकोने नवऱ्याचा नायलॉनच्या दोरीने आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. पतीने गळफास घेतल्याचा बनाव विवाहितेने रचला होता, मात्र पोलिसांच्या तपासात पत्नीनेच त्याची हत्या (Husband Murder) केल्याचं उघड झालं आहे. ही घटना उत्तमनगर मध्ये घडली.
रमेश भिसे (वय 44 वर्ष, रा. लांडगे निवास, उत्तमनगर, एनडीए रस्ता) असे खून झालेल्या पतीचे नाव असून पत्नी नंदिनी रमेश भिसे (वय 40 वर्ष) हिला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश आणि त्याची पत्नी नंदिनी भिसे उत्तम नगरमध्ये भाड्यावर खोली घेऊन राहत होते. रमेशला मद्यपानाचे व्यसन होते, मात्र तो कुठलाही कामधंदा करत नव्हता. तसंच तो सतत बायकोच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास नंदिनीने रमेशचा गळा नायलॉनच्या दोरीने आवळून खून केला.
खून केल्यानंतर नंदिनीने पतीच्या गळ्यात दोरी बांधून ती घरातील हुकाला अडकवली. पतीने आत्महत्या केल्याचे भासवले. त्यानंतर तिने मुलगा आणि नातेवाईकांना कळवले. रमेशचा मृतदेह ससून रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. यावेळी त्याचा गळा आवळून खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी नंदिनी, तिचा मुलगा, नातेवाईकांची चौकशी केली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर नंदिनीने पतीचा खून केल्याची कबुली दिली.
नवरा काहीही कामधंदा न करता सतत दारु पिण्यासाठी पैसे मागायचा. सारखा आपल्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. रोजच्या त्रासाला कंटाळून त्याचा खून केल्याचं नंदिनीने पोलिसांना सांगितले. नंदिनीला 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.