पुण्यात आज दिवसभर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमुळे वातावरण तापलेले पाहायला मिळाले. गेल्या अडीच दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थी पुण्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत. या विद्यार्थ्यांची काल आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा देत काही विद्यार्थ्यांनी अन्नत्याग केला असल्याने त्यांना पाठिंबा म्हणून स्वतः देखील अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला. काल रात्रीपासून रोहित पवार स्वतः या विद्यार्थ्यांबरोबर रस्त्यावर बसून होते.
आज सकाळी या संदर्भात राज्य सरकारने बैठक घेतली. या बैठकीमध्ये 25 ऑगस्ट रोजी होत असलेला एमपीएससी चा पेपर पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यात आली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेतले जाईल अशी अपेक्षा सरकारला होती मात्र तसे झाले नाही. एक मागणी मान्य झाली तरीही अनेक मागण्या मान्य न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवले. रोहित पवार यांनी स्वतः या विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती ही केली. येत्या सात दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या प्रकरणात लक्ष घालून विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
रोहित पवार म्हणाले, ‘आता तात्पुरते आंदोलन मागे घ्या. विद्यार्थ्यांचे एक शिष्ट मंडळ शरद पवार यांच्याबरोबर चर्चेसाठी पाठवा. शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या शिष्टमंडळाला घेऊन स्वतः शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतील. विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतील. या सगळ्याला किमान सात दिवसांचा कालावधी लागेल. तो पर्यंत विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे.’ मात्र रोहित पवार यांच्या या विनंतीनंतरही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही. पुढच्या काही वेळातच आमदार रोहित पवार यांनी आंदोलनाचे स्थळ सोडले. मात्र विद्यार्थी तिथेच होते.
कृषी विभागाच्या विद्यार्थ्यांनी रोहित पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत आंदोलनातून माघार घेतली. मात्र कम्बाईन परीक्षेची भरती आणि इतर विभागातील जागा वाढ करण्याबाबत लेखी आश्वासन जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण आणि आंदोलन चालू ठेवू, असा इशारा काही विद्यार्थ्यांनी दिला. त्यामुळे हे विद्यार्थी बराच वेळ भर पावसात आंदोलनाला बसले होते. यानंतर मात्र सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत पेपर पुढे ढकलण्याची मागणी मान्य झालेली असतानाही हे विद्यार्थी आंदोलनाला बसले असल्याने अखेर पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चार ते पाच विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून काहीवर गुन्हेदेखील दाखल केले आहेत.