एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारत अस्मिता फाउंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे वरिष्ठ सल्लागार प्रा.कविल रामचंद्रन, खासदार श्री. गौरव गोगोई, सीएनबीसी टीव्ही १८ च्या व्यवस्थापकीय संपादिका शिरीन भान, प्रसिद्ध चित्रपट निर्माते पद्मश्री मणीरत्नम, प्रसिध्द गायक पद्मश्री श्री. शंकर महादेवन आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष डॉ. कृष्णा एल्ला यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितीचे निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड यांनी दिली.
पुरस्काराचे हे १८ वे वर्ष आहे. प्रत्येकी सव्वा लाख रुपये रोख, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा समारंभ बुधवार, दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता ऑनलाइन होणार आहे.
विख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर , मुकुल माधव फाउंडेशनच्या सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात येणार आहे.
प्रशासन, कौशल्य व रणनीती यांच्यातील आव्हाने हाताळण्यात विशेष कौशल्य प्राप्त इंडियन स्कूल ऑफ बिझनेस मधील श्मिधेनी सेटर फॉर फॅमिली एन्टरप्राइजचे कार्यकारी संचालक प्रा.कविल रामचंद्रन यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’ देण्यात येणार आहे. ईशान्य भारतातील आसामचे काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उपनेते व उत्कृष्ट युवा खासदार अशी ओळख निर्माण करणारे श्री. गौरव गोगोई यांना ‘भारत अस्मिता जनप्रतिनिधि श्रेष्ठ पुरस्कार’ यांना देण्यात येणार आहे. कॉर्पोरेट धोरणात्मक बातम्या आणि व्यावसायिक घटनांचा मागोवा घेणे या क्षेत्रातील सीएनबीसी टीव्ही १८ या न्यूज चॅनलच्या व्यवस्थापकीय संपादिका शिरीन भान, चित्रपटांद्वारे संवदेशनशीलता, सामाजिक आणि राजकीय नवा बदल आणणारे प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री श्री. मणीरत्नम आणि आपल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांच्या माध्यमातून श्रोत्यांना मनमुराद आनंद देणारे गाण्यातून लोकजागृती करणारे मुंबई येथील सुप्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री श्री. शंकर महादेवन यांना ‘भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच, जागतिक आरोग्य सेवा विकसित करणे, दुर्लक्षित आजारांसाठी नाविन्यपूर्ण आरोग्य सेवा आणि कोविड १९ विरुद्ध स्वदेशी लसची निर्मिती करणारे बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. कृष्णा एल्ला यांना ‘भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
आपल्या आचार, विचार, कृतीने व सेवेने ज्यांनी आपल्या देशाच्या नाव लौकिकात भर टाकली. विविध मार्गाने आपली अमूल्य सेवा देशाला समर्पित केली अशा व्यक्तींच्या गौरवासाठी या पुरस्काराची योजना केली आहे.
भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्काराद्वारे विविध क्षेत्रांमध्ये गौरवाची कामगिरी बजावणार्या व्यक्तींच्या कार्याची माहिती तरुण पिढीला व्हावी व या पिढीने त्या मार्गावर चालण्याची जिद्द बाळगावी हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.