पुणे : मराठा (Maratha Reservation) सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्री. पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्री. गंगाधर बनबरे, सचिव श्री. सौरभ खेडेकर, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद द. पवार यांच्यामधे पुण्यात एका कार्यक्रमात मराठा आरक्षण व सद्यस्थिती यावर विस्तृतपणे चर्चा झाली. या प्रसंगी श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांनी ॲड. मिलिंद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्वलिखीत तसेच महापुरुषांच्या जीवनावर आधारित ग्रंथ भेट देऊन ॲड. पवार यांचा सन्मान केला. या प्रसंगी माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर, जिजाई प्रकाशनाचे श्री. किशोर कडू तसेच ॲड. हर्षवर्धन पवार हे उपस्थित होते.
मराठ्यांना आरक्षण हे ओबीसी कोट्यातूनच द्यावे लागेल तरच ते आरक्षण कायमस्वरूपी व टिकाऊ असेल हि मागणी मराठा सेवा संघाने फार पूर्वीपासून लाऊन धरली होती व आहे. परंतु वेळोवेळी राज्यकर्त्यांनी त्यात राजकारण करीत आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले ही वस्तुस्थिती आहे. आता पुन्हा नव्याने श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून पून्हा याच मागणीने जोर धरला आहे. मराठा समाज आता आक्रमक होताना दिसत आहे. सरकारने मराठ्यांना कायम स्वरुपी टिकणारे आरक्षण देऊ असे पुन्हा एकदा नव्याने आश्वासन दिले आहे.
त्यासाठी सरकारने काही दिवसांचा अवधी मागून घेतला होता. परंतु तसे न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊन, मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण होऊन महाराष्ट्रात दंगल सद्रूष्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु मराठा समाजाने आजपर्यंत संयम ठेवला आहे व भविष्यात देखील संयम ठेवतील अशी अपेक्षा श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. तसेच पुढची रणनीती ठरविण्यासाठी आवश्यकतेनुसार लवकरच संभाजी ब्रिगेड तसेच मराठा सेवा संघाच्या अन्य संलग्न संस्था यांच्याशी समन्वय साधून बैठकांचे आयोजन करून पुढील धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील असे ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी नमूद केल्याचे ॲड. मिलिंद पवार यांनी सांगितले.