पुणे- पुणे शहरातील कात्रज परिसरात काल मंगळवारी एका अनधिकृत गॅस गोडाऊनला भीषण आग लागली होती. या ठिकाणी लागलेल्या आगीने 20 गॅस सिलिंडरचे स्फोट झाले होते. या प्रकरणी गोडाऊन मालक आणि जागा मालकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
या सिलिंडरच्या स्फोटांनी कात्रज परिसर हादरुन गेला होता. गोडाऊन मालक सागर संदीप पाटील, जागामालक दत्तात्रय काळे, सोनू मांगडे आणि संपत सावंत अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. या संदर्भात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून या ठिकाणी अवैधरित्या विनापरवाना एलपीजी गॅस सिलिंडरचा साठा केला होता. या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर मधून लहान टाक्यात गॅस रिफिलिंग केला जात होता. काल मंगळवारी या ठिकाणी आग लागली. यामध्ये 20 गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. यामध्ये स्थानिक नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. या आगीमध्ये फुटलेल्या अनेक गॅस सिलेंडरच्या टाक्या आजूबाजूचा घरावर पडून घराच्या काचा फुटल्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पोलिस पुढील तपास करत आहेत.