जुन्नरमध्ये व्यावसायिकाची हत्या ! मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिला

25704 0

व्यावसायिक वर्चस्वाचा वाद आणि बदनामी केल्याचा राग मनात धरून एका व्यावसायिकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यात उघडकीस आली आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

किशोर तांबे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक होते. पोलिसांनी पांडुरंग जिजाबा तांबे (वय ३९ वर्ष) व महेश गोरकनाथ कसाळ (वय ३० वर्ष) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे घडली.

पोलिसांनी माहितीनुसार, आरोपींनी किशोर तांबे यांना दारू पिण्याच्या बहाण्याने शेतात बोलावले. दारू पिताना आरोपी आणि तांबे यांच्यात वादावादीस सुरुवात झाली. मुरूम व्यवसायात असलेल्या स्पर्धेमुळे आमची बदनामी करतो या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी पांडुरंग तांबे याने मित्राच्या मदतीने किशोर यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यातच तांबे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी पुरावे गायब करण्यासाठी आरोपींनी तो मृतदेह पोत्यात भरला आणि तो पाण्यावर तरंगू नये म्हणून त्यात दगड भरले. हा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता.

दरम्यान, किशोर तांबे हरवल्याची तक्रार चुलत भाऊ संतोष तांबे यांनी आळेफाटा पोलिसात दिली होती. पोलिसांना त्यांचा शोध सुरु केला. तपासाची चक्रे फिरवत परिसराची कसून तपासणी केल्यानंतर त्यांना मृतदेह तिथून जवळच असलेल्या विहिरीत आढळला.

Share This News
error: Content is protected !!