पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या घडामोडींना प्रचंड वेग आलेला होता. या घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी खळबळ उडाली होती. यानंतर राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सभागृहात घेराव घालून राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. मात्र शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
यानंतर आज सकाळी राष्ट्रवादीच्या निवड समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांच्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा नामंजूर करण्याचा आणि शरद पवार यांनाच अध्यक्षपदी काय ठेवायचं असे दोन प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. याअगोदर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवड समिती जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असे म्हंटले होते. त्यामुळे आता शरद पवार निवड समितीचा निर्णय मान्य करणार कि दुसरा कोणता मार्ग काढणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले असताना शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांनी 2 मे रोजी यांनी हा निर्णय घेतला होता. फेरविचार करत शरद पवार यांनी अखेर निवड समिती, नेते आणि कार्यकर्त्यांचा मान राखत आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निर्णयाचे ढोल- ताशे वाजवून आणि फटाके फोडून स्वागत केले आहे.