Raj Thackeray

‘दिसली जमीन की विक, महानगरपालिकेकडे टाउन प्लॅनिंग नाही’; पुणे पूरस्थितीवरून राज ठाकरेंची सरकारवर टीका 

296 0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी पुण्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून पुरबाधित नागरिकांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर आणि प्रशासनावर टीका केली.

पुण्यातील पूर स्थितीला प्रशासन जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. राज ठाकरे म्हणाले, ‘पुण्यातील नदीकाठांवर अनधिकृत बांधकाम झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अचानक जास्त पाणी सोडल्यामुळे पुण्यात पूर आला. लोकांच्या घरात पाणी शिरलं. महानगरपालिकेकडे पुण्याबाबत टाऊन प्लॅनिंग नाही. सध्या कोणत्याही शहरात टाउन प्लॅनिंग दिसत नाही. दिसली जमीन की विक असं चालू आहे. हा खूप मोठा नेक्सस चालू आहे. तसंच सध्या पुन्हा हे एक शहर नसून पाच- पाच शहरं झाली आहेत. पुण्याचा खूप कमी काळात विस्तार झालाय हे विचित्र आहे. त्यात केंद्र आणि राज्य सरकार निवडणुका घेत नाही. महानगरपालिकेत नगरसेवक नाही. त्यामुळे जबाबदारी कोण घेणार ? नगरसेवक नसल्यामुळे ही सगळी जबाबदारी प्रशासनाची आहे.’

पुढे बोलताना राज ठाकरे असले देखील म्हणाले, ‘पूर ओसरल्यानंतर पुण्यासारख्या शहराला साफसफाई करायला ठाणे आणि पनवेलहून लोक मागवावे लागले, ही लाजिरवाणी बाब आहे. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे पण अधिकाऱ्यांचं निलंबन करून प्रश्न सुटणार नाहीत. या सगळ्यात राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लक्ष घालावं लागणार आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवकांनी देखील या सगळ्यावर जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे.’

राज ठाकरे यांनी पुण्यात आलेल्या पुराबद्दल प्रशासनाला जबाबदार धरले. त्याचबरोबर बहुचर्चित नदीकाठ सुधार प्रकल्पाबद्दल देखील त्यांनी वक्तव्य केले. कोणताही प्रकल्प आणताना सगळ्यांना विचारात का घेतले जात नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर सर्व पक्षांनी हेवे दावे बाजूला सारून एकत्र बसून हा प्रश्न सोडवावा असे मत त्यांनी व्यक्त केले.

Share This News
error: Content is protected !!