महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी पुण्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून पुरबाधित नागरिकांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर, प्रशासनावर आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टीका केली.
पूरस्थिती नंतर सगळे काही सुरळीत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सरकारने लक्ष घालायला हवे, असं सांगत असतानाच राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
राज्यातून उपमुख्यमंत्री आहेत त्यातील एक तर पुण्याचेच आहेत. ते या ठिकाणी नसतानाही धरणाला पूर आला. त्यामुळे त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का ? प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर नदी काठावरील अनधिकृत बांधकाम वाढले असून अचानक पाणी सोडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली.’, अशी टीका त्यांनी यावेळी केली .
स्वच्छता करण्यासाठी बाहेरून कर्मचारी आणल्याने संताप
पूर ओसरल्यानंतर पुण्यासारख्या शहराला साफसफाई करायला ठाणे आणि पनवेलहून लोक मागवावे लागले, ही लाजिरवाणी बाब आहे. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे पण अधिकाऱ्यांचं निलंबन करून प्रश्न सुटणार नाहीत. या सगळ्यात राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लक्ष घालावं लागणार आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवकांनी देखील या सगळ्यावर जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे.’ या शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.