पुणे : पुण्यातील (Pune Car Accident) नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कार कोसळून एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे. पुण्याहून वरंधघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली आहे. या अपघातात मृत पावलेले सगळेजण पुण्यातील आहेत.
काय घडले नेमके?
पुण्यातील रावेत येथून चार जण फिरण्यासाठी निघाले होते. तेव्हा भोर तालुक्यातील निरादेवघर धरण मार्गाने महाडकडे जात असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. धुके आणि पाऊस असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने वळणावर गाडी 200 फूट उंचीवरून धरणाच्या पाण्यात पडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर एकजण थोडक्यात बचावला आहे.
संकेत जोशी (वय 26, रा. बाणेर) असे या अपघातातून बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय रमेश धाडे, स्वप्निल शिंदे आणि हरप्रीत या तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सह्याद्री रेस्क्यू फोर्स भोईराज जल आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदतीने पोलिसांनी दोन मृतदेह बाहेर काढले आहेत तर अजून एकाचा शोध सुरु आहे.