वाघाच्या कातडीची तस्करी करणारं मोठं रॅकेट उध्वस्त; वाघाच्या कातडीसह सहा जणांना पुणे सीमा शुल्क विभागानं घेतलं ताब्यात
आज देशभरात राष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जात आहे. मात्र आजच्या दिवशी पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वाघाची शिकार करून कातडी विकणारे मोठे रॅकेट सीमा शुल्क विभागाने कारवाई करत उध्वस्त केले आहे. या कारवाईत वाघाची कातडी जप्त करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत तब्बल पाच कोटी रुपये इतकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघाची कातडीची तस्करी करणारी एक टोळी जळगाव जवळ असल्याची माहिती नागपूर सीमा शुल्क विभागाने पुणे सीमा शुल्क विभागाला दिली होती. याचा तपास करण्यासाठी पुण्याहून एक पथक 26 तारखेला जळगावच्या दिशेने रवाना झाले होते. या पथकाने वाघाच्या कातडीसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश असून या टोळीच्या म्होरक्याचे नाव रहीम रफिक असे आहे. सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार या टोळीने एका वनगाईला विष देऊन मारले त्यानंतर हीच गाय वाघिणीच्या तोंडी देण्यात आली. विषबाधा झालेल्या गाईला खाल्ल्याने वाघिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर या वाघिणीचे कातडे काढून घेण्यात आले. अशा पद्धतीने वाघाची कातडी काढून त्याची तस्करी करण्यात येणार होती. मात्र त्या आधीच ही टोळी सीमा शुल्क विभागाच्या हाती लागली. या प्रकरणी सर्व आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तपासामध्ये रहीम रफिक याला याआधी सुद्धा वनविभागाने अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. या टोळीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध आहे का याचा तपास सध्या सुरू आहे.