पुणे मेट्रोचा रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मार्ग सुरू झाल्यावर दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये निरंतर वाढ होताना दिसत आहे. जून २०२४मध्ये दैनंदिन प्रवासी संख्या एक लाखापेक्षा जास्त होती. ऑगस्ट २०२४ मध्ये दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये २० % वाढ दिसून आली आहे. ऑगस्टमध्ये दैनंदिन प्रवासी संख्या १,१८,२४१ इतकी नोंदवण्यात आली आहे. तसेच ऑगस्ट २०२४ मध्ये पुणे मेट्रोला ५.६९ कोटी इतके उत्पन्न मिळाले आहे. दैनंदिन सरासरी उत्पन्न १८ लाख ६८ हजार इतके आहे. एकूण प्रवासी संख्येची विभागणी केली असता पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते जिल्हा न्यायालय या मार्गावर २९ % प्रवासी संख्या तर रामवाडी ते वनाज या मार्गावर ७१ % प्रवासी संख्या निदर्शनास आली आहे.
पुणे मेट्रोचे तिकीट घेण्यासाठी ७० % प्रवाशांनी डिजिटल मार्गाचा वापर केला, तर रोख रक्कम घेऊन तिकीट काढण्याची संख्या केवळ ३० % आहे. डिजिटल माध्यमातून तिकीट घेणाऱ्यांमध्ये पुणे मेट्रो भारतात सर्वात अग्रेसर आहे. डिजिटल माध्यमाद्वारे तिकीट घेतल्यामुळे कागदाची बचत होऊन पुणे मेट्रोच्या पर्यावरण पूरक उद्दिष्टांना मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. डिजिटल माध्यमांची विभागणी केल्यास असे निदर्शनात आले की, डिजिटल किऑस्कद्वारे २० %, तिकीट वेंडिंग मशीनद्वारे ६ %, whats app च्या माध्यमातून १८.८ %, मोबाईल ॲपच्या द्वारे ९.१७ % आणि महा मेट्रो कार्डद्वारे १३ % लोकांनी मेट्रोचे तिकीट प्राप्त केले आहे.
याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, ऑगस्ट २०२४ मधील दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये २० % पेक्षा जास्त वाढ निदर्शनास आली आहे, ही पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मोठ्या प्रमाणात डिजिटल माध्यमाद्वारे मेट्रोचे तिकीट काढले जात आहे, यावरून पुणेकरांची पर्यावरण जागृती दिसून येते. डिजिटल माध्यमाद्वारे तिकीट काढणाऱ्यांची संख्या ७० % पेक्ष्या जास्त आहे आणि हे संपूर्ण भारतातील सर्वोत्तम उदाहरण आहे