पुणे हे विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध.. मात्र तरीही मुंबई प्रमाणेच पुण्यानंही गॅंगवॉरचे अनेक चटके सहन केलेत आणि सध्या चर्चेत असलेल्या एका नावाने पुण्यातील गुन्हेगारी विश्वावर राज्य केलंय. ते नाव म्हणजेच आंदेकर… वनराज आंदेकर यांचा खून झाल्यापासून आंदेकर गॅंग पुन्हा चर्चेत आली. बाळू आंदेकर, बंडू वांदेकर आणि आता वनराज आंदेकर… आंदेकरांच्या याच तीन पिढ्यांचा आणि चार दशकांचा रक्तरंजित इतिहास पाहूया या स्पेशल स्टोरी मधून…
मुंबईतील टोळ्यांची आणि गुन्हेगारांची देशात चर्चा होत असताना पुण्यातही 70 च्या दशकात अनेक लहान मोठया टोळ्या उदयास आल्या होत्या. त्यातलीच एक टोळी होती आंदेकरांची.. बाळकृष्ण ऊर्फ बाळु आंदेकर… हा होता या आंदेकर टोळीचा मोरक्या… मटका, जुगारचे अवैध धंदे चालवणं, गावठी दारु विकणं. या सगळ्यातून ही टोळी पैसा कमवायची. इतरांना धमकवण्यासाठी, मारहाण करण्यासाठी सायकलची चैन, तलवार, रामपूरी चाकू, सोडा वॉटरच्या बाटल्या यांचा वापर व्हायचा. याच आंदेकर टोळीत प्रमोद माळवदकर नावाचा गुंड होता. मात्र आपापसातील वादातून प्रमोद माळवदकरने स्वतःची वेगळी टोळी सुरू केली. 80 च्या दशकात आंदेकर विरुद्ध माळवदकर टोळीमध्ये वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गॅंगवॉर सुरू झालं. आंदेकर टोळीने प्रमोद माळवदकर याच्या वडिलांचा खून केला. त्याचा बदला घेण्यासाठी 17 जुलै 1984 रोजी माळवदकर टोळीने शिवाजीनगर कोर्टाच्या आवारातच बाळू आंदेकरचा खून केला. आणि दोन्ही टोळ्यांमधलं गॅंगवॉर निकोपाला गेलं.
आंदेकर विरुद्ध माळवदकर हे गँगवॉर तब्बल दहा वर्ष चाललं. यामध्ये 6 गुंड मारले गेले. संपूर्ण शहरात दहशत पसरली. या दोन्ही टोळ्यांना रोखणं पोलिसांनाही जड जात होतं. मात्र या दरम्यान काळेवाडी परिसरात 19 नोव्हेबर 1997 रोजी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने प्रमोद माळवदकर याचं इन्काऊंटर केलं. आणि माळवदकर टोळी जवळपास संपुष्टात आली.
बाळू आंदेकर आणि प्रमोद माळवदकर हे दोन्ही टोळी प्रमुख मारले गेले. माळवदकर टोळीचा अस्त झाला. पण आंदेकर टोळीला नवा प्रमुख मिळाला. तो म्हणजे सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर.. या टोळीने शहरातील सर्वसामान्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत सगळ्यांमध्येच दहशत पसरवली. खंडणी, हप्ते वसुली, सुपार्या घेणं, खून करणं चालूच असताना या टोळीने राजकारणातही आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यातूनच 1998 मध्ये बाळु आंदेकर यांच्या पत्नी वत्सला आंदेकर उर्फ अक्का यांची महापौर पदी निवड झाली. गुन्हेगारी आणि राजकारण दोन्हीतही आंदेकरांनी वर्चस्व निर्माण केलं. मात्र त्याचवेळी एका खून प्रकरणांमध्ये बंडू आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यावेळी वयाने लहान असूनही बंडू आंदेकरची मुलं वनराज व कृष्णा यांच्याकडे टोळीचे सूत्र गेली. या दोघांनीही एकेकाळी शहरात प्रचंड दहशत माजवली. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. आणि 2009 मध्ये या दोघांनाही तडीपार करण्यात आलं. मात्र तरीही ही टोळी संपली नाही. कारण आंदेकर कुटुंबातील राजकारण्यांनी छुप्या पद्धतीने टोळी सुरूच ठेवली. बंडू आंदेकर याचे भाऊ उदयकांत 1992 मध्ये नगरसेवक झाले. त्यांनीही टोळीला बळकटी दिली. पुढे 2007 आणि 12 मध्ये बंडू आंदेकर यांची पत्नी आणि वनराजची आई राजश्री आंदेकर या निवडून आल्या. तर वेगवेगळ्या गुन्ह्यातील शिक्षा भोगल्यानंतर 2017 मध्ये वनराज देखील नगरसेवक म्हणून निवडून आले. सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खास म्हणून वनराज प्रसिद्ध होते. पुढे काही काळातच जन्मठेपेची शिक्षा भोगून बंडू आंदेकर बाहेर आले. आणि पुन्हा या टोळीने गुन्हेगारी जगतावर राज्य करायला सुरुवात केली.
- खून, खूनाचा प्रयत्न, हाणामारी, खंडणी वसुली असे अनेक गुन्हे या टोळीच्या नावावर आहेत. अतुल कुडले, सुरज ठोंबरे या नव्या टोळ्यांशीही आंदेकर टोळीचा संघर्ष पाहायला मिळाला. वर्षभरापूर्वी निखिल आखाडे याचा खून आंदेकर टोळीने केला. आखाडे हा गुंड सोमनाथ गायकवाडचा नातेवाईक होता. त्यामुळेच आधीपासूनच वनराजचा बदला घेण्याच्या विचारात असलेल्या सोमनाथ गायकवाडच्या मदतीने संजीवनी आणि जयंत कोमकर यांनी वनराजचा गेम केला. इतर टोळ्यांमधील गुंड संपवणाऱ्या आंदेकर टोळीला कौटुंबिक वाद मात्र संपवतात आले नाहीत आणि याचाच बळी ठरला तो वनराज आंदेकर…