Breaking News

बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार, तरुण थोडक्यात बचावला (व्हिडिओ)

825 0

पुणे- किरकोळ वादातून दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने राडा घालून तरुणावर गोळीबार केला. वेळीच पळ काढल्यामुळे संबंधित तरुण थोडक्यात बचावला. ही घटना सोमवारी मध्यरात्री बिबवेवाडी परिसरात घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित थोपटे ( वय ३२ रा. शिवशंकर सोसायटी गल्ली क्रमांक दोन, बिबवेवाडी ) याचे दत्तवाडी परिसरात सलूनचे दुकान आहे. चार फेब्रुवारी रोजी त्याचा आरोपींशी वाद झाला होता. या वादातून सोमवारी मध्यरात्री दहा ते अकरा जणांचे टोळके शिवशंकर सोसायटी परिसरात आले. हातात कोयते आणि काठ्या घेऊन आलेल्या या टोळक्याने परिसरात दहशत माजविली. त्यावेळी फिर्यादी अमित थोपटे हा घराखाली आपल्या मित्रांसमवेत थांबलेला असताना या टोळक्यातील एकाने पिस्तूल काढले आणि थोपटे याच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने वेळीच पळ काढल्यामुळे तो थोडक्यात बचावला.

गोळीबाराच्या आवाजाने शांत झालेला परिसर हादरून गेला आणि एकच गोंधळ उडाला . त्यानंतर हे टोळके दहशत माजवत परिसरातून पसार झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नासह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!