बारामती : बारामतीमध्ये (Baramati Accident) एका रस्ते अपघाताने दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव कारने धडक दिल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच या अपघातात अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे. ही मुले सकाळी शाळेत जात असताना हा अपघात झाला.
काय घडले नेमके?
बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार येथे भरधाव वेगातील चारचाकीने शाळेत जात असलेल्या तीन शाळकरी मुलांना धडक दिली. या अपघातात ओंकार संतोष खांडेकर व रुपेश अमोल खांडेकर ही दोन शाळकरी मुले मृत्यूमुखी पडली आहेत. या अपघातात संस्कार संतोष खांडेकर हा देखील गंभीर जखमी झाला आहे. संस्कार हा पाचवीमध्ये शिकत आहे. जखमी संस्कारला उपचारांसाठी गिरीराज रुग्णालयाच दाखल करण्यात आले आहे.नेहमीप्रमाणे ओंकार, रुपेश आणि संस्कार हे तिघेही शाळेत जात होते. त्यावेळी जळगाव कडेपठार गावामध्ये पुणे बारामती रस्त्यावर मोरगावकडून बारामतीकडे निघालेल्या कारने (एमएच 24- सी- 8041) शाळेत जाणाऱ्या तिन्ही शाळकरी मुलांना जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती यामध्ये कारचा पुढचा पत्रा चेपला आहे. तिन्ही मुलांना कारने पाठीमागून धडक दिल्यानंतर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वाहनाला धडकली. या अपघातानंतर मराठा मोर्च्यासाठी पोलीस बंदोबस्तावर असलेल्या प्रवीण वायसे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे व अमोल राऊत या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खासगी वाहनातून बारामतीच्या गावडे हॉस्पिटलमध्ये जखमी विद्यार्थ्यांना दाखल केले. मात्र त्यातील ओंकार खांडेकर व रुपेश खांडेकर यांचा मृत्यू झाला तर संस्कारवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बारामती पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.