पिंपरी-चिंचवड | पुण्यापाठोपाठ आता पिंपरी- चिंचवडमध्येही गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे १२ रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुईलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण आढळून येत आहेत. पुण्यातील रुग्णांची संख्या 59 वर जाऊन पोहोचली आहे. शहरातील विविध खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली असून पथक नेमण्यात आले आहेत. पुण्यातील रुग्णांचा आकडा 59 वर गेला असताना आता पिंपरी चिंचवड मध्ये या आजाराचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये १२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ही नोंद झाली आहे. आत्तापर्यंत महापालिका आणि खाजगी रुग्णालयात दाखल केलेल्या बारा रुग्णांपैकी सहा रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर उर्वरित सहा जणांवर उपचार सुरू आहेत. संत तुकाराम नगर मध्ये पाच रुग्ण आढळून आले त्यातील दोन जण बरे झाले आहेत. मोशी मध्ये तीन रुग्ण आढळले त्यातील दोन रुग्ण बरे झाले आहेत. चिखली मध्ये एक आढळून आला त्यावर उपचार सुरू आहे. कासारवाडीत दोन आढळून आले. त्यातील एक बरा झाला तर एकावर सध्या उपचार सुरू आहे. वाकड परिसरात एक रुग्ण आढळून आला परंतु तो आता बरा झाला आहे. या आजाराची मुख्य चार लक्षणे आहेत. हातपाय कमकुवत होणे. हाता पायाला मुंग्या येणे. गिरण्यास व बोलण्यास त्रास होणे. धाप लागणे व श्वास घेण्यास त्रास होणे. यासाठी काय काळजी घ्यावी हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. या आजारापासून आपला बचाव करण्यासाठी पाणी उकळून व गाळून प्यावे. उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे. हातपाय व स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास तपासणी करून घ्यावी. हा आजार नवीन नसून यापूर्वीही या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे आढळून आल्यास तातडीने महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणी करून घ्यावी. या आजारासाठीची सर्व औषधे महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध आहेत. घाबरून जाण्याची आवश्यकता नाही अस आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.