पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जीबीएस या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. पुण्यातली रुग्णसंख्या 130 वर गेली आहे. एक 56 वर्ष कॅन्सर ग्रस्त महिलेला या आजाराची लागण झाली. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपोषणादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पुण्यात GBS ची लागण झालेल्या एका तरुणाचा सोलापुरात मृत्यू झाला. आता पिंपरी चिंचवडमध्येही जीबीएस आजारामुळे पहिला रुग्ण दगावला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसने पहिला रुग्ण दगावलाय. 36 वर्षीय तरुण पिंपळे गुरवचा रहिवासी होता. 21जानेवारीला तो पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. मात्र उपचारासाठी आला तेव्हापासून तो व्हेंटिलेटरवर होता. गेले आठ दिवस त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले, मात्र काल त्याने अखेरचा श्वास घेतला. पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये जीबीएसमुळं हा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. शहरात आत्तापर्यंत जीबीएसचे 13 रुग्ण आढळलेत त्यातील हा पहिला बळी ठरला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ला आतापर्यंत केलेल्या चाचण्यांमध्ये पाण्यात कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आढळले नाहीत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आता या जीवाणूच्या स्वरूपाचे जनुकीय अनुवांशिकतेद्वारे विश्लेषण करणार आहे. यातून या आजाराच्या उद्रेकाची कारणे समोर येतील. हा जीवाणू किमान पाच रुग्णांच्या स्टूलच्या नमुन्यांमध्ये आढळून आला. यावर आणखी संशोधन सुरू आहे.. पुण्यातील रुग्णांची संख्या 130 वर आहे तर अद्यापही 20 रुग्ण व्हेंटिलेटर वर आहेत.जीबीएस चे रुग्ण फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच नाही तर राज्यातल्या विविध भागात आढळून येऊ लागले आहेत.. कोल्हापूर, सोलापूर, सांगली नंतर साताऱ्यात ही जीबीएसचा शिरकाव झाला आहे.मात्र या जिल्ह्यांतील रुग्ण संख्या कमी आहे. दोन, चार, सहा अशा प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामूळे पालिका प्रशासन अलर्ट मोडवर असून घरांची तपासणी, निर्जंतुकीकरण अशी योग्य ती काळजी घेतली जात आहे.
गुइलेन बॅरे सिंड्रोम हा दूषित पाण्यामुळे होणारा आजार आहे. जीबीएस रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यास सुरुवात केली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून सिंहगड रस्ता परिसरातील जलस्राोतांसह खडकवासला धरणातील पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यात ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जीवाणू आढळल्याने हे पाणी प्रक्रिया न करता पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. पुण्यात पालिका प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.. नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. मात्र योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे..