बारामती: लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागलं असून आता काका अजित पवार यांना घेण्यासाठी अजित पवार यांचे सख्खे पुतणे योगेंद्र श्रीनिवास पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
योगेंद्र पवार आज पासून बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी यात्रा काढणार असून ही यात्रा पुढील बारा दिवस चालणार आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार हे संभाव्य उमेदवार असण्याची चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेनंतर युगेंद्र पवार हे ‘स्वाभिमान यात्रे’ला कण्हेरी येथील मारुती मंदिर येथे दर्शन घेऊन सकाळी ९ वाजता सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ९.१५ वाजता माळावरच्या देवीचे दर्शन घेऊन ते पक्ष कार्यालयात १२ वाजेपर्यंत उपस्थित राहून नागरिकांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
यात्रेच्या निमत्ताने युगेंद्र पवार हे विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. दुपारी २ वाजता मुढाळे येथील बैलगाडा शर्यतीस भेट, ३ वाजता
माळेगांव बुद्रूक, ४ वाजता गोफणे व बाघमोडे वस्ती, ५ वाजता माळेगांव कारखाना, ६ वाजता येळे बाळे वस्ती येथे भेट असा त्यांचा दौरा असणार आहे. ही स्वाभिमानी यात्रा १२ दिवसांची असून बारामती तालुक्यातील सर्व गावांना युगेंद्र पवार भेटी देणार आहेत.