पुणे- रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे युक्रेनमध्ये सुमारे 20 हजार भारतीय विद्यार्थी हे अडकले असून या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणले जाईल असे आश्वासन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना दिले.
आज केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हे आज पुणे दौऱ्यावर आले असून पुणे जिल्ह्यातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांच्या पालकांची आणि व्ही मुरलीधरन यांच्यात पुण्यातील जे डब्ल्यू हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद, उपस्थित होते.
युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना लवकरात लवकर भारतात आणले जाईल असे आश्वासन व्ही मुरलीधरन यांनी बैठकीत दिले. तसेच बॉर्डर क्रॉस करताना मुलांना काहीही अडचण होऊ नये याची देखील काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.