साल होतं… 1988… बरोबर 34 वर्षांपूर्वी औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही अशी डरकाळी फोडली होती. आज पुन्हा याच मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेतायत… या मैदानावर पुन्हा एकदा हेच वाक्य ऐकायला मिळणार मात्र राज ठाकरे यांच्या मुखातून…
1988च्या बाळासाहेबांच्या सभेनं इतिहास घडवला आणि मुंबई, ठाण्याबाहेर पहिल्यांदाच औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेच्या वाघाच्या पावलांचे ठसे उमटले. शिवसेनेचे तब्बल 27 नगरसेवक निवडून आले. आज मराठवाड्यात शिवसेनेचे 11 आमदार आणि 3 खासदार आहेत. बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील याच मैदानावर आपला करिश्मा दाखवण्यास सज्ज झाले आहेत. आधी शिवतीर्थावरची गुढीपाडव्याची सभा मग ठाण्यातली उत्तरसभा आणि आज औरंगाबादची राजसभा… एका महिन्यात तीन सभांची हॅट्ट्रिक साधत राज ठाकरेंनी इतर राजकीय पक्षांना आम्हीही मैदानात आहोत, असा जणू इशाराच दिलाय. राज ठाकरे आजच्या औरंगाबादच्या सभेत काय बोलणार यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात असले तरी त्यांनी उकरून काढलेल्या भोंगावादाचा हा तिसरा अंक असणार हे नक्की ! राज ठाकरेंच्या लागोपाठ होणाऱ्या या सभांमुळं सर्वांत जास्त अस्वस्थता पसरलीये ती शिवसेनेच्या गोटात. शिवसेनेची नेतेमंडळी विविध वक्तव्य करून राज ठाकरेंवर निशाणा साधत असतानाच आज राज ठाकरे आपल्या सभेतून त्यावर काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.