घराणेशाहीवरून काँग्रेसच्या नावानं घसाफोड करणाऱ्या भाजपचा पहिल्याच उमेदवार यादीत भांडाफोड झाला. उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या 99 पैकी 13 जणांना देण्यात आलेली तिकीटं म्हणजे भाजपनं 13 घराण्यांत खैरात वाटल्याप्रमाणं वाटली आहेत. कुठं कुणाच्या मुलीला, मुलाला तर कुठं कुणाच्या पत्नी अगर भावाला उमेदवारीचं तिकीट देऊन भाजपमध्येही घराणेशाहीची चलती असल्याचं दाखवून दिलंय. भाजपसोबत
या 13 घराण्यांपैकी 11 घराणी आधीपासून सोबत होतीच आता नांदेडचं चव्हाण घराणं आणि इचलकरंजीचं आवाडे घराणं ही आणखी 02 घराणी नव्यानं जोडली आहेत.
भोकर : अशोक चव्हाण – श्रीजया चव्हाण (बाप-लेक)
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपवासी झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपकडून नांदेडमधील भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण राज्यसभेवर गेल्यानं भोकरची जागा रिक्त होती. ‘मला राज्यसभा आणि मुलीला विधानसभा,’ अशी ‘डील’ करूनच अशोक चव्हाणांनी भाजप प्रवेश केला असल्याच्या चर्चेला आता बळकटी मिळाली आहे.
………….
भोकरदन : रावसाहेब दानवे – संतोष दानवे (पिता-पुत्र)
जालन्याचे सलग 05 वेळा खासदार आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांना भोकरदन
विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा 2024 च्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला असला तरी भाजपनं त्यांचे पुत्र संतोष दानवे यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संतोष दानवे भाजपच्या तिकीटावर आमदार बनले होते. रावसाहेब दानवे याच भोकरदन मतदारसंघातून 1990 आणि 1995 असे दोनदा आमदार राहिले आहेत.
………….
कणकवली : नारायण राणे- नितेश राणे (पिता-पुत्र)
माजी केंद्रीय मंत्री तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना कणकवली विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. नितेश राणे 2019 च्या निवडणुकीत कणकवली मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदार झाले होते. त्यापूर्वी म्हणजे 2014 मध्ये ते काँग्रेसकडून पहिल्यांदा आमदार बनले होते.
…………..
शिवाजीनगर : अनिल शिरोळे- सिद्धार्थ शिरोळे (पिता-पुत्र)
पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. 2019 मध्ये ते याच मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर पहिल्यांदा आमदार बनले होते. 2014 च्या निवडणुकीत अनिल शिरोळे भाजपच्या तिकीटावर पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले होते.
……………
खामगाव : स्व. पांडुरंग फुंडकर – आकाश फुंडकर (पिता-पुत्र)
माजी कृषिमंत्री स्व. पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आकाश फुंडकर यांना खामगाव विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर याच मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांचे वडील पांडुरंग फुंडकर खामगाव मतदारसंघातून दोनदा आमदार राहिले होते. 1978 मध्ये जनता पक्षाकडून तर 1980 मध्ये भाजपकडून निवडून आले. 1985 मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला होता. 1984 मध्ये त्यांनी भाजपकडून अकोला लोकसभा
लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर मात्र 1989, 1991 आणि 1996 अशा तिन्ही निवडणुका जिंकून त्यांनी खासदारकीची सलग हॅटट्रिक साधली. 1999 मध्ये मात्र ते पराभूत झाले. 31 मे 2018 रोजी त्यांचं निधन झालं.
………..
हिंगणा : दत्ता मेघे – समीर मेघे (पिता-पुत्र)
आधी काँग्रेस मग राष्ट्रवादी नंतर पुन्हा काँग्रेस आणि त्यानंतर भाजपमध्ये स्थिरावलेले माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुत्र समीर मेघे यांना खामगाव विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर याच मतदारसंघातून निवडून आले होते. दत्ता मेघे यांचे दुसरे पुत्र सागर मेघे यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वर्धा मतदारसंघातून तिकीट दिलं होतं पण त्यात त्यांचा पराभव झाला होता.
…………..
पनवेल – रामशेठ ठाकूर – प्रशांत ठाकूर (पिता-पुत्र)
शेतकरी कामगार पक्षाकडून दोनदा खासदार राहिलेले आणि 2014 च्या दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांचे पुत्र प्रशांत ठाकूर यांना पनवेल विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर याच मतदारसंघातून निवडून आले होते. 2009 च्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर याच मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा आमदार बनले होते.
……….
इचलकरंजी – प्रकाश आवाडे – राहुल आवाडे (पिता-पुत्र)
काँग्रेसकडून 04 वेळा आणि 2019 मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपनं त्यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच उमेदवारी दिली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या राहुल आवाडे यांना उमेदवारी देऊन भाजपनं इचलकरंजीमधील आवाडे घराण्याला आपल्याकडं वळवलं आहे.
…………….
वांद्रे पश्चिम/मालाड पश्चिम : आशिष शेलार- विनोद शेलार (भाऊ-भाऊ)
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी देताना त्यांचे बंधू विनोद शेलार यांना भाजपनं मालाड पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदाच उमेदवारी दिली आहे. आशिष शेलार वांद्रे पश्चिम मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते.
…………..
चिंचवड : स्व. लक्ष्मण जगताप शंकर जगताप (भाऊ-भाऊ)
माजी आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना चिंचवड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. लक्ष्मण जगताप याच मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर 2023 मध्ये लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी श्रीमती अश्विनी जगताप यांना तिकीट देण्यात आलं आणि त्या आमदार झाल्या. आता त्यांचा पत्ता कट करून भाजपनं लक्ष्मण जगताप यांचे बंधू म्हणजेच श्रीमती अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
.………….
श्रीगोंदा : बबनराव पाचपुते – प्रतिभा पाचपुते (पती-पत्नी)
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा पत्ता कट करून त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. बबनराव पाचपुते याच मतदारसंघातून 1980 मध्ये जनता पक्षाकडून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 1990 मध्ये ते जनता दलाकडून आमदार बनले. पुढं 1995 मध्ये काँग्रेस, 2004 मध्ये अपक्ष तर 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून त्यांनी आमदारकीची सलग हॅटट्रिक साधली. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये ते पुन्हा एकदा श्रीगोंद्याचे आमदार बनले.
…………….
कल्याण पूर्व : गणपत गायकवाड – सुलभा गायकवाड (पती-पत्नी)
भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्व मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 2009 आणि 2014 मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या गणपत गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2019 मध्ये ते याच मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून येत तिसऱ्यांदा आमदार बनले. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर भर पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत.
भाजपकडून 13 घराण्यांत तिकीटांची खैरात!
भोकर : अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण (पहिल्यांदा)
भोकरदन : रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे (तिसऱ्यांदा)
कणकवली : नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे (दुसऱ्यांदा)
शिवाजीनगर : अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे (दुसऱ्यांदा)
खामगाव : स्व. पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आकाश फुंडकर (तिसऱ्यांदा)
हिंगणा : दत्ता मेघे यांचे पुत्र समीर मेघे (तिसऱ्यांदा)
पनवेल : रामशेठ ठाकूर यांचे पुत्र प्रशांत ठाकूर (तिसऱ्यांदा)
इचलकरंजी : प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे (पहिल्यांदा)
मालाड पश्चिम : आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार (पहिल्यांदा)
चिंचवड : स्व. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप (पहिल्यांदा)
श्रीगोंदा : बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते (पहिल्यांदा)
कल्याण पूर्व : गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड (पहिल्यांदा)
एकूणच काय तर भाजपनं आपल्या पहिल्याच यादीत 13 घराण्यांत उमेदवारी देऊन आमच्या पक्षात घराणेशाहीची चलती असल्याचं दाखवून दिलं आहे. कुठं कुणाची मुलगी, तर कुठं कुणाच्या मुलांना तसेच कुठं कुणाची पत्नी आणि कुठं कुणाच्या भावांना उमेदवारी देऊन भाजपनं स्वतःवर घराणेशाहीचा शिक्का मारून घेतला आहे.
संदीप चव्हाण, वृत्तसंपादक, ‘TOP NEWS मराठी’