महाड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश होऊन मोठी दुर्घटना झाली आहे. मात्र सुदैवाने सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. हे हेलिकॉप्टर नेमके कशामुळे क्रॅश झाले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. महाडमध्ये ही दुर्घटना घडली आहे.
काय घडले नेमके?
अपघात झाला तेव्हा सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या. त्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश झालं. गेल्या 2 दिवसांपासून सुषमा अंधारे ठाकरे गटाचे रायगडमधील उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गितेंच्या प्रचारासाठी रायगड दौऱ्यावर आहेत. आज आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरने मुरुडला जाणार होत्या. त्यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर महाडमधील एका मैदानात उतरत असताना त्याचा अपघात झाला. जमीनीपासून काही फुटांवर असतानाच हेलिकॉप्टरवरील पायलटचं नियंत्रण सुटलं आणि ते खाली पडलं. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. हेलिकॉप्टरचं मोठं नुकसान झालं आहे. धुळीचे लोट उडाल्याने हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे समजत आहे.
सुषमा अंधारे सुखरुप असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. सध्या त्या महाडमध्येच आहे. मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.