Maharashtra Politics : शिवसेनेला आणखीन एक मोठा धक्का ;रामदास कदम यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र…!

210 0

Maharashtra Politics : शिवसेनेला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील नेत्यांचे पक्ष सोडण्याचे सत्र सुरूच आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश रामदास कदम हे देखील काही दिवसापूर्वीच शिंदे गटांमध्ये सामील झाले आहेत.

रामदास कदम हे आपला राजीनामा मातोश्रीवर पाठवण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान या राजीनाम्यामध्ये त्यांनी आपल्या मनातील खदखद देखील स्पष्ट शब्दात व्यक्त केली आहे.

” शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र शिवसेनाप्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेतेपदाला कुठलीही किंमत राहिली नाही. हे मला पाहायला मिळालं,आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आलं.

2019 साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवत होतात ,त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की ,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत संघर्ष केला. व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती करू नका…! ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल, अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही. याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेनाप्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती, आणि म्हणून मी आज शिवसेना नेता या पदाचा राजीनामा देत आहे.

Share This News
error: Content is protected !!