पुणे: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत.
अशताच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवरून जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे.
महायुतीमध्ये रस्सीखेच असणाऱ्या जागांपैकी एक जागा म्हणजे इंदापूर विधानसभेची जागा. या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रेय भरणे हे विद्यमान आमदार आहेत तर याच जागेवर भाजपा नेते आणि माजी संसदीय कार्य आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दावा सांगितला आहे.
इंदापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळत असतानाच हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील असं मागील अनेक दिवसापासून राज्याच्या वर्तुळात बोललं जात असतानाच आता स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी मोठे विधान केलं आहे.
पितृपंधरवड्यापर्यंत थांबा नंतर मोठा निर्णय घेईल जनतेच्या मनात आहे तोच निर्णय घेणार असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
त्यामुळे पितृपक्षानंतर हर्षवर्धन पाटील भाजपाला सोडचिठ्ठी देणार का? आणि ते खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे