पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः खानापूर आटपाडी आणि सांगोला तालुक्यासाठी जीवनदायनी ठरलेल्या योजनेच्या सहाव्या टप्प्यातील कामाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच भूमिपूजन पार पडलं. या योजनेला खानापूर आटपाडीचे आमदार स्वर्गीय अनिल बाबर यांचं नाव देण्यात आलं. पश्चिम महाराष्ट्रासाठी टेंभू योजना कशी गेम चेंजर ठरेल आणि या योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्रातला राजकारण कसं फिरू शकतं यावरचा ‘टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट’…
आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प अशी टेंभू योजनेची ओळख आहे. कराड तालुक्यातील टेंभू गावाजवळ हा प्रकल्प साकारला गेला. राज्यात शिवसेना भाजपा युतीचे सरकार असताना निवडून 1995 मध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आली. स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांना या टेंभू योजनेचे जनक म्हणून ओळखला जातो याच अनिल बाबर यांचं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू योजनेच्या सहाव्या विस्तारीकरण योजनेला दिलं आहे.
नेमकी टेंभू योजना आहे काय?
हा प्रकल्प कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत येतो.
प्रकल्पांतर्गत कृष्णा नदीवर टेंभू गावाजवळ बॅराज बांधून विविध टप्प्यांद्वारे 22 टीएमसी पाणी उचलले जाणार आहे.
याद्वारे सातारा, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांतील सात तालुक्यांतील 80हजार 472 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचा प्रस्ताव होता.
प्रकल्पालगतचे उंचीवरील क्षेत्र सिंचनापासून वंचित होते. या क्षेत्राला पाणी देण्यासाठी स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती.
टेंभू विस्तारित उपसा सिंचन योजनेसाठी पाणी देण्याचा प्रस्ताव सरकारला 2022 मध्ये देण्यात आला होता.
या योजनेमुळे सांगली जिल्ह्यातील 59,872 हेक्टर सोलापूर जिल्ह्यातील 20,000 हेक्टर आणि सातारा जिल्ह्यातील 600 हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे.
या योजनेच्या पाचव्या टप्प्यामार्फत एकूण 22 टीएमसी पाणी उचलून 964 किलोमीटरच्या कालव्यांमार्फत 167 बंदिस्त पाईपलाईन द्वारे लाभक्षेत्रात पाणी पोहोचवण्यात येत आहे.
या योजनेच्या सहाव्या टप्प्यामुळे आणखी 28 आटपाडी तालुक्यातील आणखी 14 गावं तासगाव तालुक्यातील आणखी 12 गाव लाभक्षेत्रात येणार आहेत.
तसंच या योजनेच्या सहाव्या टप्प्यामुळे मान खटाव आणि सांगोला तालुक्यात पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या योजनेच्या प्रभावक्षेत्रात खानापूर-आटपाडी,सांगोला, तासगाव कवठेमंहकाळ, असे मतदारसंघ येतात. माण-खटाव, जत या मतदारसंघांवरही या योजनेचा प्रभाव आहे.
या योजनेचा मतदारसंघांवर कसा प्रभाव पडतो?
या योजनेचा राजकीय दृष्ट्या प्रभाव पाडणारा पहिला मतदारसंघ आहे अर्थातच खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ
या मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते स्व. अनिल बाबर त्यांचं जानेवारी 2024 मध्ये निधन झालं.
शेवटच्या श्वासापर्यंत अनिल बाबर हे टेंभू योजनेसाठीच झटत राहिले
सध्या या मतदारसंघातून अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर हे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून टेंभू योजनेचा आतापर्यंत झालेला फायदा आणि भविष्यातील फायदा ही स्थानिक पातळीवर घेऊन जाण्यात सध्या सुहास बाबर हे यशस्वी होताना दिसत आहेत.
त्यामुळे खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघासाठी ही योजना गेम चेंजर ठरेल असं बोललं जातंय
या योजनेचा राजकीय दृष्ट्या प्रभाव पाडणारा दुसरा मतदारसंघ आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील आमदार आहेत
याच मतदारसंघाचं शेतकरी कामगार पक्षाच्या भाई गणपतराव देशमुख यांनी सलग अकरा वेळा प्रतिनिधित्व केलं आहे.
सांगोला मतदार संघाच्या प्रभावक्षेत्रातून जाणाऱ्या तीन महत्त्वाच्या पाणलोट योजना आणि या योजनांवरून होत असलेल्या किंवा झालेल्या राजकारण लक्षात घेता शहाजी बापू पाटील यांना फायदा होण्याची शक्यता बोलली जात आहे.
दरम्यान टेंभू योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला फायदा होणार का? की महाविकास आघाडी मुसंडी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे…