‘छत्रपती शिवरायांचं पुणं, फुलेंचं पुणं, टिळकांचं पुणं… आमचं पुणं, आपलं पुणं… पुणं तिथं काय उणं ! आम्ही पुणेकर एकत्र येऊन लढलो तर काय करू शकणार नाही ? कोरोनाकाळात आम्ही पुणेकरांनी जे करून दाखवलं ते एक पुणेकर म्हणून मी कधीही विसरू शकणार नाही..!’
………………………
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ‘महापौर जनसंवादा’च्या समारोपाच्या भागात बोलत होते पण बोलताना तितकेच भावुकही झाले. कोरोनाकाळात पुण्याचा प्रथम नागरिक म्हणून काम करताना त्यांनी जे काही प्रसंग कथन केले ते ऐकून पुणेकरही गहिवरले.
……………………….
ती एक काळरात्र…
प्रसंग १ ला/ कोरोना काळ/वेळ : रात्रीचे बारा
(मला आजही ती भयाण रात्र आठवतेय ? रात्रीचे बारा वाजले असतील… महापालिका आयुक्तांचा फोन आला आणि…)
आयुक्त : महापौर साहेब, आपल्या जम्बो कोविड सेंटरमधील ऑक्सिजन साठा संपत आलाय. केवळ एक तास पुरेल इतकाच ऑक्सिजनशिल्लक आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टँकरचा अजूनही पत्ता नाही. काय करायचं ?
महापौर : आयुक्तांनी सांगितलेली परिस्थिती ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. जम्बोमध्ये 750-800 रुग्ण अॅडमिट होते. हे सर्व रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर होते. काय करावं ते सूचेना. मी माझ्या पुणेकरांचा जीव आता कसा वाचवू ? डोळ्यांसमोर एकदम अंधार झाला. फोनाफोनी सुरूच होती. ऑक्सिजन साठा संपायला अवघी 15-20 मिनिटं शिल्लक होती. तितक्यात, आयुक्तांचा फोन आला…
आयुक्त : महापौर साहेब, टँकर पोचले बरं का !
महापौर : तिकडं ऑक्सिजनचा पुरवठा करणारे टँकर पोचले आणि इकडं कावराबावरा झालेला माझा जीव भांड्यात पडला. टँकर पोचायला थोडा जरी उशीर झाला असता तर होत्याचं नव्हतं झालं असतं… ती रात्र आणि तो प्रसंग… नको, त्याची आठवणच नको !
………………..
महापौर : पुण्यात कोरोना कहर माजवत होता. मृत्यूचं तांडव सुरू होतं. अंत्यविधीसाठी स्मशानभूमी, दफनभूमी कमी पडत होत्या. अशा कठीण प्रसंगात आपली म्हणणारी माणसं आपल्यालाच ओळखेनाशी झाली होती. कुठं माणुसकीनं मान टाकली होती तर कुठं माणुसकी ताठ मानेनं उभी होती. हॉस्पिटलमधून घरच्यांना गेलेला फोन आणि त्यावर नातेवाईकांकडून मिळालेलं उत्तर तर मन सुन्न करून टाकणारं होतं…
माणुसकी संपली; माणुसकी दिसली…
प्रसंग २ रा/ कोरोना काळ/वेळ : कायम वाजलेले बारा
हॉस्पिटल: हॅलो, तुमच्या माणसाची कोरोनामुळं ‘डेथ’ झालीये. येताय का इकडं ?
नातेवाईक : हो पण…
हॉस्पिटल : अहो ती तुमची आई आहे, वडील आहेत, भाऊ आहे, बहीण आहे… या की लवकर…
नातेवाईक : हे बघा ते सारं ठीक आहे हो पण आम्हाला ‘बॉडी’ नको; तुम्हाला काय करायचं ते करा…
महापौर : हे सारं ऐकून माणुसकी संपली, असंच वाटायला लागलं पण अशावेळी माझ्या महापालिका कर्मचाऱ्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी त्या मृत व्यक्तींचे नातेवाईक बनून त्यांच्यावर अंत्यविधी केले आणि माणुसकी अजून संपलेली नाही ती जिवंत आहे हे दाखवून दिलं.
आणि आता जाता जाता…
कोरोनाच्या पहिल्या लाटेत माझ्यासह माझ्या कुटुंबाला कोरोनानं ग्रासलं. कुटुंबातील लहान मुलगी, आई-वडील अशा सोळा जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. माझ्यासह आम्ही सात-आठ जण अॅडमिट होतो पण पुणेकरांचं प्रेम आणि आशीर्वादामुळं माझ्यासह माझं सारं कुटुंब कोरोना संकटातून सुखरूप बाहेर पडलं. शेवटी, पुणेकरांची सेवा माझ्या हातून घडायची होती ना ? जाता जाता एकच सांगतो, मी आता महापौर नसलो म्हणून काय झालं ? कार्यकर्ता म्हणून पुणेकरांच्या पाठीशी कायम उभा राहीन, बस्स इतकंच !
– संदीप चव्हाण (9325240175)
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी