महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून या नोटीसीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
महाराष्ट्रात झालेल्या पोलीस अधिकारी बदली घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी 12 मार्चला दुपारी पत्रकार परिषदेत म्हटलं, “मार्च 2021 मध्ये प्रदेश भाजपा कार्यालयात एक पत्रपरिषद घेतली होती. त्यात पोलिस बदल्यांच्या रॅकेटचे संपूर्ण पेनड्राईव्ह, ट्रान्सक्रिप्ट यासंदर्भात माहिती देत, ते मी त्याच दिवशी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांना सादर केले होते. पुढे न्यायालयाने ही चौकशी सीबीआयकडे दिली.
“तथापि, महाविकास आघाडी सरकारने आपला हा घोटाळा दाबण्यासाठी एक एफआयआर केला.
यासंदर्भात मला नोटीसा देण्यात आल्या. माहिती देईन, असे मी सांगितले होते. आता मला सीआरपीसी 160 अंतर्गत पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्यासाठी नोटीस प्राप्त झाली.”
“विरोधी पक्षनेता म्हणून माझा विशेषाधिकार आहेच आणि माहितीचा स्त्रोत मला विचारला जाऊ शकत नसला तरी मी चौकशीला जाणार आणि विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर देणार.
पोलिसांनी चुकीची केस केली असली तरी माजी गृहमंत्री म्हणून पोलिसांना पूर्ण सहकार्य करीन,” असंही फडणवीस पुढे म्हणाले.